एक्स्प्लोर
मटण दरवाढीविरोधात नोटीस बजावल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस
मटणाचा तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कोल्हापूरात मटणाचे दर 560 ते 580 रुपये प्रति किलो झाले तर बोंबाबोंब ही व्हायचीच. त्यामुळे वाढलेले हे दर कमी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना साकडे घातले होते.

मुंबई : मटण दरवाढीविरोधात मटणविक्रेत्यांवर दबाव टाकून दुकान बंद करण्याची नोटीस बजावणाऱ्या कोल्हापुरातील ग्रामपंचायतींचा मुंबई उच्च न्यायालयानं समाचार घेतला आहे. अशाप्रकारे नोटीस बजावण्याचे कोणतेही अधिकार नसताना केलेल्या कारवाईचा खुलासा मागत गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही हायकोर्टानं नोटीस बजावली आहे. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कोल्हापूरात मटणाचे दर 560 ते 580 रुपये प्रति किलो झाले तर बोंबाबोंब ही व्हायचीच. त्यामुळे वाढलेले हे दर कमी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना साकडे घातले होते. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशा आशयाची नोटीस मटण विक्रेत्यांना बजावली आहे. व्यावसायिकांनी नोटीसीला हायकोर्टात आव्हान देत अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की मटणाच्या दरावरून अशा प्रकारे दुकान बंद करण्याबाबत कोणतीही नोटीस बजावण्याचा ग्रामपंचायतींना अधिकारच नाही. हायकोर्टाने याची दखल घेत गारगोटी, कडगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश देत सुनावणी 12 जानेवारीरर्यंत तहकूब केली. Kolhapur Meat | कोल्हापुरातील मटणाच्या दरावर अखेर तोडगा | ABP Majha मटणाचे दर वाढल्याने अस्वस्थ असलेल्या कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी (10 डिसेंबर) झालेल्या बैठकीत मटणाला 480 रूपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केला. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर आज तोडगा निघाला. शिवाजी पेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात ही बैठक झाली होती. कोल्हापुरातल्या मटण दरावर खासदार संजय मंडलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंडलिक म्हणाले, मटण दराचा प्रश्न अखेर सुटला, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर ही खवय्यांची नगरी आहे. त्यामुळे या दरवाढीने फटका बसला होता. कोल्हापुरातले कार्यकर्तेही स्वाभिमानी आहेत कुठलाही प्रश्न हातात घेतला की तडीस नेतात. अनेक तालमीमध्ये ही त्यामुळे दरवाढीला विरोध होता.
आणखी वाचा






















