(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीत वाढ; हॉलंड, युकेला प्रथमच निर्यात
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे अजित पवारांचे प्रतिपादन. ग्लोबल कोकण, शेतकरी संघटनांनी घेतली भेट. कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील आंबा भेसळ रोखण्याबाबत दिले निवेदन
मुंबई : शेतातील हापूस आंबा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्यापारी, बाजारपेठ यांच्यावर अवलंबून असणारा कोकणातील शेतकरी आता स्वावलंबी होऊ पाहत आहे, किंबहुना स्वावलंबी झाला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद असतानाही शेतकर्यांनी न थांबता हापूसची थेट विक्री केल्याने त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. ही थेट विक्री पद्धत यंदाही अवलंबली जात असून, यामुळे हापूस निर्यातीत वाढ झालेली दिसत आहे.
परदेशातून हापूस आंब्याला वाढती मागणी असून, हॉलंड येथे 400 डझन आणि युके येथे 400 डझन आंबा पेटींची 'मायको'द्वारे प्रथमच निर्यात करण्यात येत आहे. या निर्यात पेटींचा आरंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 'मायको' या देशातील पहिल्या मँगोटेक प्लॅफॉर्मच्या माध्यमातून शेतकर्यांना बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने त्यांना योग्य तो मोबदलाही मिळत आहे.
कोकणातील हापूसचा सुगंध जगभर न्यायला हवा असं म्हणत शेतातील हापूस आंबा थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची संकल्पना खरोखरच चांगली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला आमचा पाठिंबा कायम राहील, अशा शब्दांत अजित पवार यांनी या संकल्पनेचं कौतुक केलं. लवकरच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंबा बाजार आयोजित केला जाणार असून त्याला शासनातर्फे पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासनही त्यांनी दिलं.
नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते शिवाय ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे आंबे मिळत असल्याने त्यांची फसवणूक होते. हे सर्व निदर्शनास आणून देत योग्य ती पावले उचलण्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले'' असल्याचे 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव या कार्यक्रमावेळी म्हणाले. तर, "मायको' या हायटेक डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना सहज उपलब्ध होत असून या प्लॅटफॉर्मला मुंबई, महाराष्ट्र आणि परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.'' असा आनंद 'मायको'चे सीईओ दिप्तेश जगताप यांनी व्यक्त केला. '
एप्रिल अखेर आणि मे महिन्यात हापूस आंब्याचे भाव प्रचंड कमी होत असल्याने गेली दहा-पंधरा वर्ष कोकणातील हापूस आंब्याचा शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि याचे मुख्य कारण दक्षिण भारतातील हापूससारख्या दिसणाऱ्या आंब्याची कोकणातील हापूस म्हणून केली जाणारी फसवणूकपूर्ण विक्री आणि स्पर्धा आहे. या दोन्ही आंब्यांच्या चवीत, दर्जामध्ये तसेच सालीमध्येही फरक असतो, ही बाब यावेळी लक्षात आणून देण्यात आली.
कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील आंब्यामध्ये फरक कसा ओळखायचा?
कोकणातील हापूस - आंब्याच्या वरील साल पातळ असते, आंबा आकारानं गोलसर तर, आतमधून केशरी रंगाचा असतो.
कर्नाटकमधील आंबा - आंब्याची वरची साल जाड असते. आकाराच्या बाबतीत आंबा खालच्या बाजूला निमूळता असतो तर, आतमधून पिवळसर रंगाचा असतो.