Maharashtra: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचं निधन; जाणून घ्या त्यांचा इतिहास...
Hambirrao Amritrao Baji Mohite Dies: कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचं पुण्यात 98व्या वर्षी निधन झालं आहे.
Pune: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचं शुक्रवारी (30 जून) पुण्यात निधन झालं. वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी (2 जुलै) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कॅप्टन हंबीरराव मोहिते हे कराडच्या तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तिसरे सुपुत्र रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील 7 पिढ्यांनी भारतीय लष्करी सेवेत योगदान दिलं आहे. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टँक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात बाजी-मोहिते, त्यांचे सैनिक आणि अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि भारतीय लष्करामध्ये आपलं नाव अजरामर केलं. कॅप्टन हंबीरराव वयाच्या 20 व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाले होते. महायुद्धानंतर हंबीरराव यांची नेमणूक मित्र देशांच्या जपान येथील मुख्यालयात करण्यात आली. हंबीरराव यांनी जपानची संस्कृती जवळून ओळखली आणि याचा त्यांना पुढेही फायदा झाला. पुढे हंबीरराव यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यामुळे त्यांना लष्करी सेवेतून लवकर निवृत्त होऊन कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागली. हंबीरराव यांनी वडिलोपार्जित 80 एकरची शेती करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी 1950 पासून तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात हंबीरराव यांनी 'सैनिक स्कूल' स्थापन केलं आणि या सैनिक स्कूलची आदर्श अशी रूपरेषा आखण्यात कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी सरकारला महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. पाकिस्तान आणि चीनने भारतावर हल्ला केला, त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील मुलांनी सैनिकी शिक्षण द्यावे, या उद्देशाने या स्कूलची स्थापना केली. त्यामुळेच आज लष्करामध्ये सातारच्या सैनिक स्कूलमधील विद्यार्थी महत्त्वाच्या अधिकारी पदावर भारतीय सैन्यामध्ये रुजू झाले आहेत. साताऱ्यातील सैनिक स्कूल उभारण्यामागे हंबीरराव यांचा मोलाचा वाटा आहे.
कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी अनेक बँकांमध्ये महत्त्वाच्या पदावर कामं केली. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा अशा संस्थांमध्ये काम करून सहकार्य क्षेत्रात आणि शेती व्यवसायात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. हंबीरराव यांचा मुलगा अमेरिकेवरून येणार असल्यामुळे कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांचा अंत्यविधी रविवारी (2 जुलै) सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
हेही वाचा: