(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंढरपुरात कोरोना संकटातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची उलाढाल, विकली 800 कोटींची द्राक्षे
द्राक्षे नेण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यावर देशमुख यांनी द्राक्ष व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली . देशभरातील 12 राज्यात खरेदीदार तयार झाले पण प्रश्न होता द्राक्षे तोडण्यासाठी मजुरांचा. पुन्हा यासाठी प्रशासन मदतीला धावले आणि परराज्यातील मजूर निघून गेल्यानंतर स्थानिक मजुरांना संपर्क साधण्यास सुरुवात झाली .
मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे उद्योग, व्यवसाय आणि शेतीची उत्पन्ने बंद पडलेली असताना प्रशासन व शेतकऱ्यांनी एकत्रित येत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अशा अडचणीच्या काळातही देशभरात 800 कोटीची द्राक्षे विकत लढण्याची जिद्द दाखवून दिली. एका बाजूला लॉकडाऊन तर दुसऱ्या बाजूला संचारबंदी अशा भीषण परिस्थितीत कासेगावातील जवळपास सात हजार एकर वरील द्राक्ष बागा फळांनी लगडून गेल्या होत्या. कोट्यावधींचे फळ बागेबाहेर कसे आणायचे या चिंतेत शेतकरी असताना द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक असलेल्या प्रशांत देशमुख यांनी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात बैठक घडवीत यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली. डोळ्यासमोर उभे असलेले कोट्यवधींचे पीक कोरोनामुळे मातीमोल होण्याची भीती लक्षात घेत उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी या शेतकऱ्यांना यावर उपाय सुचवले.
द्राक्षे नेण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यावर देशमुख यांनी द्राक्ष व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली . देशभरातील 12 राज्यात खरेदीदार तयार झाले पण प्रश्न होता द्राक्षे तोडण्यासाठी मजुरांचा. पुन्हा यासाठी प्रशासन मदतीला धावले आणि परराज्यातील मजूर निघून गेल्यानंतर स्थानिक मजुरांना संपर्क साधण्यास सुरुवात झाली . पाहता पाहता परिसरातील 10 हजार मजुरांच्या हाताला अशा अडचणीच्या वेळी काम मिळाले. द्राक्षे तोडणी झाल्यावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत या द्राक्षांचे पॅकिंग करून रोज 200 ट्रक कासेगावातून बाहेर पडू लागले. या वाहनांना शासकीय परवाने मिळवून देण्यासही प्रशासनाने मदत केली आहे.
कासेगावातील द्राक्ष बागांचा माल दिल्ली, कलकत्ता, जयपूर, बेंगलोर, कोचीनसह देशातील अनेक बाजारपेठेत जाऊ लागला . गेल्यावर्षी कासेगावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 1100 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. एकही रुपया मिळण्याची अपेक्षा नसताना केवळ प्रशासनाच्या सहकार्यामुळे या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत . अजूनही उरलेला माल देशभरातील बाजारात जात असून प्रशासन व शेतकरी यांच्यातील सहकार्यामुळे कोरोनाच्या संकटातही कासेगावला मिळालेले 800 कोटी रुपये त्यांना पुढचे वर्षभर पुन्हा खंबीरपणे उभे करण्यात उपयोगी येणार आहेत.
Ground Report Of Corona | तुमच्या जिल्ह्यातील कोरोना काय म्हणतोय? | ग्राऊंड रिपोर्ट | ABP Majha