Election Commission : मोठी बातमी : ग्राम पंचायत सदस्यांना खर्च दाखवण्यासाठी उरले काही दिवस, ट्रू व्होटर अॅपने खर्च सादर करण्याचे आदेश
Maharashtra Gram panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत हिशोब सादर करणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील (Gram Panchayat Election) उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे (True Voter App) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) केले आहे.
राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे.
नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहे; परंतु पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.