(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती ठरल्या, 5 मतदारसंघात कोण-कुणाविरुद्ध भिडणार?
MLC Election News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
MLC Election News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर येथील मतदारसांमध्ये चुरस वाढली आहे. त्यामुळे पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. पाहूयात कोणत्या मतदारसंघात कुणा विरोधात कोण लढणार आहेत... प्रमुख आणि चर्चेतील लढतीबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात...
कोणत्या आणि कधी निवडणुका-
नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघ -
नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी संपला आहे. आज सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे ही जागावरील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये काय स्थिती?
नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी कॉंग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच महाविकास आघाडीच्या समर्थनाने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने येथे आपला उमेदवार दिलेला नाही, भाजपनं नागो गाणार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
अमरावतीमध्ये कोण कोण रिंगणात?
अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे उमेदवार आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेब) व रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघ -
महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. येथे भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद
गेली कित्येक वर्षे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील असाच खरा सामना रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विधान परिषद कोणा विरूद्ध कोण
कोकण शिक्षक मतदार संघ
बाळाराम पाटील ( शेकाप)
ज्ञानेश्वर म्हात्रे ( भाजप)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
विक्रम काळे ( राष्ट्रवादी)
किरण पाटील ( भाजप)
नाशिक पदवीधर
सत्यजित तांबे (अपक्ष)
धनराज विसपुते (अपक्ष)
धनंजय जाधव (अपक्ष)
नागपूर शिक्षक
गंगाधर नाकाडे (मविआ - शिवसेना)
नागो गाणार ( भाजप पाठींबा)
अमरावती पदवीधर
धीरज लिंगाडे (मविआ - कॉग्रेस)
डॉ. रणजित पाटील ( भाजप उमेदवार)
कपिल पाटील महाविकास आघाडीवर नाराज?
महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी आपले उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी नाराजी नाट्य माञ अजून क्षमल्याच पाहिला मिळतं नाही. कारण महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. नागपूर शिक्षक मतदार संघाची जागा शिक्षक भारतीला देण्यात येईल अशी चर्चा पूर्वी झाली होती मात्र आता ही अट महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष विसरले असल्याचं कपिल पाटील यांचं म्हणणं आहे.