गोंदिया: गोंदियाचे पालकमंत्री आणि ईडीचा ससेमिरा हे समिकरणच झालं आहे असं दिसतंय. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविणाऱ्या दोन मंत्र्यांची ईडीने चौकशी केली आणि नंतर त्यांना अटकही केली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि ईडी अटक याचे काही समीकरण की केवळ योगायोग अशी चर्चा सुद्धा जिल्ह्यात जोर धरत आहे


विशेष म्हणजे ईडीकडून अटक होणारे हे दोन्ही नेते राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाची संबधित आहेत. गोंदियाचे पालकमंत्री राहिलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आणि आता विद्यमान पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.


गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असताना कॅबिनेट मंत्री असलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 2005 ते 2009 आणि 2009 ते 2014 या दरम्यान गोंदियाचे पालकमंत्रीपद भूषविले आहे. पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच, 2019 मध्ये ते गृहमंत्री होत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्याकडून लावण्यात आलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात त्यांची ईडीने चौकशी केली आणि नंतर त्यांना अटक केली. आता ते ईडीच्या कैदेत आहेत. 


अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यांना आता अंडरवर्ल्डशी असलेले संबध व जमीन खरेदी-विक्री प्रकरणातून अटक करण्यात आली. आधीच गोंदिया जिल्ह्याचे वरिष्ठ राष्ट्रवादी नेते असलेले प्रफुल्ल पटेल ईडीच्या चौकशीला सतत सामोरे जात असतांना गोंदियाचेच दोन पालकमंत्री असलेले राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना झालेली ईडी अटक विशेष आहे. त्यामुळे गोंदिया आणि ईडी हे समीकरण की योगायोग हाच चर्चेचा विषय ठरला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: