Raigad Floods | अंबा, कुंडलिका नदीला पूर; नागोठणे, रोह्यात जनजीवन विस्कळीत
नागोठणे येथील अंबा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागोठणे शहरातील बाजारपेठ आणि कोळीवाडा परिसरात अंबा नदीचे पुराचे पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे अंबा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नागोठणे येथील मुख्य बाजारपेठ, एसटी बसस्थानक आणि कोळीवाडा परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटी सेवा सकाळपासून ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा तालुक्याला बसला आहे. येथील कुंडलिका नदीनेही रौद्ररूप धारण केल्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. रोहा तालुक्यातील धामणसह या गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.