Mahesh Landge : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलने केली. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजपने आंदोलन केले. यावेळी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली. देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य लांडगे यांनी केले आहे. मलिक यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा लगावला.


नवाब मलिकांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने अटक केली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. सत्ताधारी असणाऱ्या महाविकास आघाडीकडून मलिकांच्या समर्थनासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. तसेच नवाब मलिक यांच्या राजीनामाच्या मागणी देखील भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. याच पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील उमटले. मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड भाजपने आंदोलन केले होते. यावेळी बोलताना लांडगे यांनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला. तसेच बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी,असे वादग्रस्त वक्तव्य केले. या लांडगेच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीना वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मनी लॉंड्रिंग प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायलयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत ईडीची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांनी परस्पर विरोधी आंदोलने केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ईडी आणि केंद्र सरकारविरोधात टीकास्त्र सोडले. तर भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 


ईडीचा युक्तीवाद


दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. हसिना पारकर आणि नवाब मलिक याचां संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत. त्यानंतर सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना तीन मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: