सांगलीत सराफा दुकानाला बोगदा पाडून धाडसी चोरी, 18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
सांगलीत एका सराफा दुकानात चोरी झाली. दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून चोरटे आत घुसले आणि 18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
सांगली : सांगलीतील आटपाडीमध्ये चक्क सराफा दुकानाला बोगदा पाडून 18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले. सिने स्टाईलने केलेल्या या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीच्या दिघंची इथल्या सराफा दुकानात या धाडसी चोरीची घटना घडली आहे.
विटा-मायणी रोडवरील विटा मर्चंट बँके समोर असणाऱ्या आदिती ज्वेलर्स या सोन्या-चांदीचे दुकानात ही चोरी झाली आहे. दुकानाच्या मागील बाजूला असणारी भिंत फोडून बोगदा पाडून चोरटे दुकानात शिरले आणि तिथे असलेले सोन्या -चांदीचे दागिने लुटले. यामध्ये 232 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच साडे पंधरा किलो चांदीचे दागिने आणि रोख 70 हजार असा एकूण 18 लाख 36 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
आदिती दुकानाच्या मागील बाजूस मोकळी पडीक जागा आहे. चोरटे दुकानाच्या मागील भिंत फोडून बोगदा पाडत आत शिरले आणि दुकानात असलेला ऐवज लुटला. या चोरीमध्ये चार ते पाच जणांची टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अत्यंत चलाखीने ही चोरी करण्यात आली आहे. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाझुडपाचा आधार घेऊन चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडले.
भुयार खोदून बँकेवर दरोडा, चोरट्यांनी कितीचा मुद्देमाल लुटला?
बँक दरोड्यासाठी खोदलेल्या भुयाराचा व्हिडीओ हाती
या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईत तीन वर्षांपूर्वी भुयार खोदून बँकेवर दरोडा
नवी मुंबईतही तीन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. बँक ऑफ बडोदाच्या दरोड्यात सुमारे 3 कोटींची चोरी झाली होती. फिल्मी स्टाईलने भुयार खोदून बँकेत दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. जुईनगर सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील 30 पैकी 28 लॉकर्स दरोडेखोरांनी फोडले. या जबरी दरोड्यात 2 कोटी 90 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचं सानपाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती. बँकेच्या शेजारी असलेलं दुकान भाड्याने घेत चोरट्यांनी दरोड्याचा कट रचला होता. त्यांनी दुकानापासून बँकेपर्यंत 41 फूट भुयार खोदलं. त्यामधून बँकेत घुसून गॅस कटरच्या साहाय्याने 28 लॉकर्सवर हात साफ केला.