छेडछाडीमुळे अकरावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरं!
ही घटना पंढरपूर तालुक्यातील शेळवे या गावात घडली आहे. सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न यामुळे अधुरं राहिलं आहे.
![छेडछाडीमुळे अकरावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरं! Girl commits suicide due to harassment in pandharpur छेडछाडीमुळे अकरावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/13214210/crime.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघणाऱ्या स्वप्नालीने छेडछाडीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यातील शेळवे या गावात समोर आला आहे. स्वप्नाली ही अकरावीत शिकणारी हुशार मुलगी, घरी गरिबी असल्याने शिक्षणासोबत बॉक्सिंग आणि धावणे या खेळांची आवड तिने जपली होती. शरीर तंदुरुस्त बनवत सैन्यदलात जाऊन भारतमातेची सेवा करायचे तिचे स्वप्न गावातीलच तिघांच्यामुळे धुळीस मिळाल्याचे दुःख तिने आपल्या चिट्ठीत लिहून ठेवले आहे.
स्वप्नालीने सहा डिसेंबरच्या रात्री गळफास घेतल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिच्या मृत्यूची अकस्मात नोंद केली. मात्र, 10 डिसेंबरला तिने लिहिलेली चिट्ठी तिच्या दप्तरात सापडल्यावर पुन्हा नव्याने गुन्ह्यात कलमे वाढवून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काल या तीन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता या तीनही आरोपीना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेळवे येथील सत्यवान गाजरे हे तिचे वडील, गावात पंक्चर काढायचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचा एक अपघात झाल्यावर स्वप्नाली त्यांना या कामातही मदत करत असे. रोज नियमितपणे व्यायाम आणि सर्व करणारी स्वप्नाली घरातील सर्व कामे करत होती. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तिचे अकरावीचे शिक्षण देखील घरी राहूनच सुरु होते. मात्र, गावातील रमेश गाजरे, स्वप्नील कौलगी आणि लहू टेलर यांच्याकडून सातत्याने छेडछाड होत असल्याने आपण जीवन संपवत आहे, अशा प्रकारची स्वप्नालीची चिट्ठी मिळाली आहे.
हा छेडछाडीचा त्रास ती नववीत असल्यापासून सहन करत होती. तिने कुटुंबालाही याबाबत सांगितले. मात्र, वडिलांनी प्रयत्न करूनही छेडछाड न थांबल्याने अखेर स्वप्नालीने तिचे जीवन संपवले. आपली मुलगी गेली तशी इतरांची जाऊ नये असे सांगत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी तिची आई करीत आहे. मुलगी सांगायची पण आम्ही भीत होतो. अशा शब्दात तिच्या आईने असहायता बोलून दाखवली. तर गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ झाल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. तीन दिवस प्रयत्न केले. मात्र. ज्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यावर गुन्हा दाखल झाला असे सांगताना सर्वसामान्यांची दाद पोलिसांनी घेणे गरजेचे असून पोलीस स्टेशन फक्त पुढाऱ्यांसाठी नसावेत असा संतापही स्वप्नालीच्या वडिलांनी बोलून दाखवला.
आता या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस स्वप्नालीच्या चिट्ठीवरून तपास करीत असून चिठ्ठीतील हस्ताक्षराचीही तपासणी सुरु केली आहे. या तीन आरोपींमध्ये दोन आरोपी विवाहित असून एक तर पन्नाशीत आलेला असल्याने या प्रकरणातील गूढ आता वाढत चालले आहे.
घटनाक्रम : सहा डिसेंबरला रात्री उशिरा स्वप्नालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सात डिसेंबरला अकस्मात मृत्यूची पोलिसात नोंद. 10 डिसेंबरला स्वप्नालीची चिट्ठी मिळाली. यानंतर पोलिसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल. 12 डिसेंबरला तीन आरोपींना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्नालीची लाल पेनाने लिहिलेली एक चिट्ठी आता मिळाली आहे.
तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या; पंढरपूरच्या शेवळे गावातील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)