नांदेडमध्ये दोन शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पाच जणांवर गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यातील शंकरनगरमधील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. सदर प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड : बिलोलीतील शंकरनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळेतील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकांनी मुलीवर अत्याचार केल्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पिडीत मुलीवर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थीनीची प्रकृती सुधारत असून सदर प्रकरणातील दोन शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन आरोपींविरोधात 18 जानेवारी रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शंकरनगरमधील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो, असं सांगून शाळेतील एका खोलीत घेऊन गेले. त्यानंतर मोबाईलवर एक अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. पीडित विद्यार्थिनी जखमी अवस्थेत आढळून आली आणि त्यानंतर तिला नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शंकरनगरमधील 7वीत शिकणाऱ्या मुलीवर 2 महिन्यांपूर्वी दोन शिक्षकांनी अत्याचार केला होता. सदर प्रकार समजताच पीडितेच्या आईने शिक्षकांविरोधात मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदविली होती. पण घटान समजल्यानंतरही मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. याउलट पीडित मुलगी आणि तिच्या आईवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांनी बलात्काराच्या प्रकरणाची कुठेही वाच्यता करु नये म्हणून पीडित मुलीच्या आईकडून शपथपत्र लिहून घेतल्याची बाबही समोर आली आहे.
दरम्यान, सदर प्रकरणातील धक्कादायक प्रकार म्हणजे, याप्रकरणात शिक्षकांना मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली असल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणात समावेश असणाऱ्या शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत ग्रामस्थांनी शहरामध्ये बंद पुकारला आहे.