(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'घेऊया का शपथ पहाटे पहाटे! मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्या 'त्या' व्हिडीओवर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
एकेकाळचे जीवलग राजकीय मित्र, पण आता वेगवेगळ्या राजकीय दिशेला असलेल्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. दरम्यान एकेकाळी राजकीय मित्र असलेले आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले आणि त्यांच्यात संवादही झाला.
आता एकेकाळचे जीवलग राजकीय मित्र, पण आता वेगवेगळ्या राजकीय दिशेला असलेल्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या कानात काही तरी कुजबुज केली. झालं मग नेटकऱ्यांनी हाच व्हिडीओ व्हायरल करत याचे अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. , हे दोन नेते कानात एकमेकांना काय बोलले असतील याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
कोल्हापुरात दोन्ही नेत्यांचा दौरा आहे हे समजल्यानंतर याची मोठी उत्सुकता कोल्हापूरकरांना लागली होती. त्यामुळे बघ्यांची, माध्यमांची, पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांची गर्दी होती. दोन्ही नेते एकमेकांसमोर आले, परंतु गर्दीत आवाज ऐकू येत नसल्याने कानात काहीतरी सांगितले. यावर नेटकऱ्यांनी लगेच 'सर्कीट हाऊसवर तांबडा पांढरा मस्त आहे, ताव मारून जा', घेऊया का शपथ पहाटे पहाटे! असे मिम्स बनवले.
त्याचं झालं असं, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते. याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला निरोप पोहोचवला. “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकत्र पाहणी झाली.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी