राम मंदिर निर्माणासाठी हाती घेतलेली निधी संकलन मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अभूतपूर्व
निधी संकलनासाठी हे स्वयंसेवक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आणि 12.47 कोटी परिवारांना यादरम्यान संपर्क करण्यात आला.
नागपूर : राम मंदिर निर्माणासाठी हाती घेतलेली निधी संकलन मोहीम ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अभूतपूर्व ठरली आहे. या मोहिमेत संघ 545737 स्थानांवर पोहचला ज्यात जवळ जवळ 20 लाख स्वयंसेवकांनी भाग घेतला. निधी संकलनासाठी हे स्वयंसेवक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आणि 12.47 कोटी परिवारांना यादरम्यान संपर्क करण्यात आला.
ही माहिती शुक्रवारी बंगळुरू येथे सहसरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य ह्यांनी संघाच्या दोन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर प्रतिनिधी सभेत येणाऱ्या तीन वर्षांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विस्ताराच्या मेगा प्लानवर शिक्का लागणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रतिनिधी सभेतच संघाच्या सरकार्यवाह पदाची निवडणूकही होणार आहे.
एकीकडे राहुल गांधी, त्यांचे समर्थक आणि चाहते हे संघाची तुलना मुस्लिम brotherhood शी करत असले, तरी दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांपासून तर समाजातील वेगवेगळ्या संघटनांमध्ये संघाचे स्वयंसेवक कार्यरत आहे. संघाला विरोध हा जुना असला, तरी संघ हा या विरोधातूनच वाढला आणि आज देशात किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे. या प्रतिनिधी सभेत समाजाचा एक मोठा वर्ग आणि संघटना येत्या ३ वर्षात संघाशी जोडण्यासाठी सुद्धा प्लान आखला जाणार आहे.
आठ दशकांनंतर गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचं दर्शन
संघाचे काम आज 6000 मंडळ, वस्त्यांमध्ये पोहचले आहे . प्रत्येक मंडळ हे 10 हजार लोकसंख्येच्या वर असून यात 7 ते 8 गावे येतात. येत्या तीन वर्षात हे काम 1.20 लाख मंडळांपर्यंत नेण्याचा प्लान आहे.
आपत्तीकाळात स्वयंसेवक हे देशात ठिकठिकाणी मदत आणि पुनर्वसनाच्या कामाला लागतात. यावेळी ही कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना राशन आणि इतर मदत पोहचवण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी केले. त्याकाळात समाजातील इतर ही अनेक संघटना देशभर कार्यरत होत्या. यातील असंख्य संघटनांचा आणि लोकांचा संघाशी संबंध नसला तरी या काळात संपर्क आला. मात्र आता या संगठना आणि लोकांना आपल्याशी कसे जोडता येईल याचा प्लान प्रतिनिधी सभेत संघ आखणार आहे . ही माहिती संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी दिली.
प्रतिनिधी सभेत तीन वर्ष आधीच्या प्रतिनिधी सभेत संघाने स्वतःसाठी जी पर्यावरण, ग्राम विकास आणि सामाजिक बदलाची टार्गेट्स सेट केली होती त्यात किती यश आले ह्याचा आढावा ही घेतला जाईल. या बैठकीत एक सर्वांच्याच कुतूहलाचा विषय राहणार आहे तो म्हणजे सरकार्यवाह पदाची निवडणूक. दर तीन वर्षाने हि निवडणूक होत असली तरी 2009 पासून भैय्याजी जोशीच सरकार्यवाह पदावर आहेत. काही चर्चा हि दत्तात्रय होसबळे ह्यांच्या नावाची होत असली तरी यावर्षी ही भैय्याजी जोशी बदलल्या जातील असे संघ सूत्रांच्या माहितीवरून वाटत नाही. 20 मार्चला 11 वाजता ही निवडणूक अपेक्षित आहे.
देशात सरसंघचालकांचा चेहरा हा संघाचे प्रतिनिधीत्व करणारा असला, तरी सरसंघचालक हे संघाच्या रोजच्या कामकाजात नसतात. संघाचे रोजचे काम हे सरकार्यवाह बघतात किंवा खऱ्या अर्थाने संघाच्या प्रशासनाची जवाबदारी ही सरकार्यवाहांवर असते. जी व्यक्ती ह्या खेपेला सरकार्यवाह राहील तिच्या कार्यकाळात सुरु होईल संघाच्या शंभरीचा उत्सव.
निवडणूक वर्षाची प्रतिनिधी सभाही नागपुरात होत आली आहे, पण कोविडमुळे पहिल्यांदा ही नागपूरबाहेर होत आहे. मात्र देशातच एकंदरीत कोवीडची स्थिती पाहता संघानेसुद्धा बरेच बदल यावेळी केले आहेत. फक्त 450 प्रतिनिधी हे बैठकीला स्वतः येणार असून बाकीचे 1000 प्रतिनिधी हे ऑनलाईन जोडल्या जातील. तसेच 3 दिवसांऐवजी हि बैठक दोनच दिवस घेतली जाणार आहे.