Fuel Price Hike : निवडणुका संपल्या की, इंधन दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का? : जयंत पाटील
जयंत पाटील यांनी देशातील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थितीत देशात आणि राज्यात वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : "निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी देशातील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थितीत देशात आणि राज्यात वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये जयंत पाटील म्हणाले की, "केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की, पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय नियोजन आहे, यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा." असे मत जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केले आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90.68 रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
आठवडाभरापासून देशात इंधन दरवाढ कायम, परभणीत पेट्रोल 100.75 पैसे तर डिझेल 90.68 पैसे
मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. आज आठव्या दिवशी 5 राज्याच्या निवडणूका झाल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणी करांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार; गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. काल पेट्रोलचे दर पेट्रोल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैशाने तर डिझेल मध्ये 57 पैशाने वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :