कलाकार म्हणून अमोल कोल्हेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य: राष्ट्रवादी चित्रपट आघाडी
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारलीय. त्यावरुन आता वाद निर्माण झालाय.
अकोला : 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटातील खासदार अमोल कोल्हेंनी वठविलेली नथुराम गोडसेची भूमिका हा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं मत राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात 'एबीपी माझा'शी बोलत यावर राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. या चित्रपटाचा 'ट्रेलर' रिलीज झाल्यावर अमोल कोल्हेंना अनेकांनी टीकेचं लक्ष्य केलं आहे.
सन 2017 मध्ये तयार झालेला हा चित्रपट आता 'रिलिज होत आहे. मात्र, या चित्रपटाच्या अनुषंगाने खासदार अमोल कोल्हेंना लक्ष्य करणं अनाठायी असल्याची राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीची भूमिका आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार, स्वातंत्र्य आणि कर्तव्य बहाल केले आहे. त्यानुसारच खासदार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असल्याला आमचा विरोध नसल्याचं राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं स्पष्ट केलं आहे."
राष्ट्रवादी काँग्रेस हा महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा पक्ष असून या भूमिकेत काहीही बदल झाल्याचा वा होण्याच्या सवालच नसल्याचं राष्ट्रवादी चित्रपट विभागानं म्हटलंय. अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी असून त्यानुसारच ते भूमिका साकारत आहेत.परंतु, त्यांची वैचारिक बांधिलकी राष्ट्रवादीच्याच भूमिकेशी असल्याबाबत आमच्या मनांत कोणताही संदेह नसल्याचं राष्ट्रवादी चित्रपट विभागानं म्हटलं आहे. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात. तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून असलेल्या बांधिलकीतून साकारत असल्याचा मूलभूत फरक असल्याचं प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.
अभिनयाकडे फक्त कला म्हणून बघितलं तर वैचारिक गोंधळ उडणार नसल्याचं पाटील यांनी टिकाकारांना सुनावलंय. यासंदर्भात त्यांनी खलनायकी भूमिका साकारतांनाच समाजाला वैचारिक दिशा देणाऱ्या अनेकांचे दाखले राष्ट्रवादी चित्रपट विभागाने दिलेत. मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक अजरामर करणाऱ्या निळूभाऊ फुलेंचं महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत मोठं योगदान आहे. यासोबतच हिंदीतील अमरिश पुरी, सदाशिव अमरापूरकर, डॅनी, कादरखान, परेश रावल यांनी समाजाला कायमच दिशा दिल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 'रामायण' मालिकेत 'रावण' साकारणारे अरविंद त्रिवेदी पुढे भाजपचे खासदार झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
संबंधित बातमी :