एक्स्प्लोर
भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या, पाण्यात बुडून चौघींचा मृत्यू
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू झाल्याने सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

नाशिक : भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील सातपूर परिसरात ही घटना घडली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू झाल्याने सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत असतानाच, नाशिकमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे. सातपूरच्या बेळगाव ढगा परिसरात शिंदे नामक एक कुटुंब राहत असून, आज सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं. दुपारी मनीषा शिंदे या आपल्या दोन लहान मुलींसह सूनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळीलच एका बंधाऱ्यावर गेल्या होत्या. काम आटोपल्यावर पाय धुवत असतांनाच एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने इतर तिघीही यात बुडाल्या. विशेष म्हणजे, घरातीलच एक लहान मुलगी या परिसरात खेळत असताना तिने हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांसह परिवारातील इतर सदस्यांनी इथे धाव घेत त्यांचा शोध घेऊन चारही जणींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं, मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये मनीषा अरुण शिंदे, वृषाली अरुण शिंदे, ऋतुजा अरुण शिंदे आणि आरती निलेश शिंदे यांचा समावेश आहे. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या नोंदणीच काम सुरु असून गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने शिंदे कुटुंबावर घाला घातला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























