एक्स्प्लोर
Advertisement
33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ, वनमंत्री मुनगंटीवारांनी सयाजी शिंदेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली
वृक्षलागवडीच्या या चळवळीला थोतांड म्हटलं ते आश्चर्यजनक आहे. वृक्ष लागवडीमध्ये अनेक संस्था जुळल्या आहेत. महाराष्ट्रातील एका चांगल्या मिशनला बदनाम करण्याचं पाप आपल्या हातून झालं आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.
मुंबई : 33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ असल्याचं स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. त्यामुळे या पवित्र योजनेला बदनाम करुन स्वयंप्रेरणेने वृक्ष लागवड करणाऱ्यांचा हिरमोड करु नका, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे. आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार बोलत होते. अभिनेता आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारची ही योजना थोतांड असल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर लावलेली झाडं जगवण्याची कोणतीही सोय सरकारकडे नसल्याचा ठपका ठेवत मुनगंटीवारांना 5 सवाल केले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आज मुनगंटीवारांनी सरकारची बाजू मांडली. वृक्षलागवडीच्या या चळवळीला थोतांड म्हटलं ते आश्चर्यजनक आहे. वृक्ष लागवडीमध्ये अनेक संस्था जुळल्या आहेत. महाराष्ट्रातील एका चांगल्या मिशनला बदनाम करण्याचं पाप आपल्या हातून झालं आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.
काय होते सयाजी शिंदेंचे प्रश्न आणि त्यावर वनमंत्री मुनगंटीवारांची उत्तरं
सयाजी शिंदे :- 33 कोटी वृक्ष जगवण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे?
वनमंत्री मुनगंटीवार :- 33 कोटी वृक्ष लागवड हे लोक आंदोलन आहे. हा आरोप म्हणजे अज्ञानातून आणि माहितीच्या अभावातून केला गेला आहे. वनविभाग हे वृक्ष लावतोय असं नाही. वनविभाग 33 कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष्य घेऊन विविध संस्था, संघटना यांना मदतीला घेऊन पूर्ण करत आहे. वन विभाग एकटा हे वृक्ष लावत नाहीत. यासाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर समित्या गठीत केल्या आहेत. हे वसुंधरेचं ऋण फेडण्याचे मिशन आहे. त्यांना कदाचित हे माहिती नसेल. यामध्ये अनेक विभाग, संस्थांचा समावेश आहे. अज्ञानापोटी अशा पद्धतीचे कथन करतो हा अन्याय आहे.
सयाजी शिंदे :- महाराष्ट्र सरकारच्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारच्या जाती आहेत का?
वनमंत्री मुनगंटीवार :- आपल्या नर्सरीमध्ये वनाशी संबंधित सर्व जाती आहेत. आपल्या नर्सरीमध्ये वड, कडुलिंब, पिंपळ यासारखे 156 प्रजातींचे वृक्ष आहेत. त्या त्या प्रदेशात येणाऱ्या प्रजातींचे वितरण त्या त्या विभागात केले जाते. यासंबंधित यादी आपल्याकडे आहे. 28 हजार ग्रामपंचायतींना ही यादी आणि वृक्ष पुरवण्यात आले आहेत.
सयाजी शिंदे :- वृक्ष लागवडीमध्ये सरकार इतर राज्यांचा आदर्श का घेत नाही?
वनमंत्री मुनगंटीवार :- आपला आदर्श आता देश घेत आहे. आपला आदर्श घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशात नॅशनल हायवे वर 125 कोटी वृक्ष लावण्याचे संकल्प केला आहे. आपला आदर्श घेऊन नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी पर्यावरण सचिवांना नागपूरच्या आपल्या कमांड रूममध्ये पाठवलं. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या या मोहिमेची दोनदा नोंद घेतली. आपल्या महाराष्ट्राच्या या कामाला इतर लोकं प्रोत्साहित करत आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये 43 देशाचे राजदूत आले आणि त्यांनी या विषयाची माहिती घेऊन कौतुक केलं.
सयाजी शिंदे :- वृक्ष लागवडीसंदर्भात अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते की नाही?
वनमंत्री मुनगंटीवार :- सर्वच ठिकाणी जबाबदारी निश्चित होते. आपण केवळ अधिकाऱ्यांचीच जबाबदारी निश्चित करत नाहीत तर आपलीही जबाबदारी आहे. वृक्ष लावण्यात सहज भाव असावा. हा इतका सहज भाव असावा की मी जेवढे प्रदूषण करतो त्याबद्दल मी वसुंधरेचं ऋण माझ्याकडून फेडलं गेलं पाहिजे. हा या मिशनचा उद्देश आहे. प्रत्येकाने या मिशनमध्ये कामी यावं. यासाठी आपण ग्रीन आर्मी तयार केली. यामध्ये 62 लाख तरुणांनी यामध्ये नोंद केली आहे.
महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ थोतांड असल्याची अभिनेता सयाजी शिंदेंची टीका
महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक असल्याचं शिंदे यांनी म्हटलं होतं. शिवाय हे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचं कुरण आहे. 5 कोटी वृक्ष लागवड हेच मुळात थोतांड असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलं होतं. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतली आहे. यामध्ये 33 कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य सरकारचं आहे. तसा निर्धार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र राज्य सरकारची ही वृक्षलागवड योजना फक्त दिखाव्यापुरती आहे, अशा शब्दात सयाजी शिंदेंनी सरकारवर टीका केली होती. आपल्याकडे झाडांच्या जवळपास 250 जाती उपलब्ध असताना अनेक ठिकाणी, शाळांच्या अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यांमध्ये जाऊन झाडे लावली जातात. 33 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा गाठण्यासाठी सरकार कोणतीही झाडं लावत आहे. वनखात्याच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवत वृक्ष लागवड हे केवळ नाटक असल्याचा आरोप सयाजी शिंदे यांनी केला होता. आपल्याकडून राज्यात 23 ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये माझ्याकडून वृक्ष लागवडीचं काम सुरु आहे. मात्र मी त्याचा शूटिंग करत नाही. येत्या काळात ही संख्या आणखी वाढेल. झाडे लावतांना कोणत्या ठिकाणी कोणतं झाड लावावं यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत, अशी माहिती सयाजी शिंदेंनी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement