(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजऱ्यात बसवले कर्मचारी, वनविभागाची शक्कल महागात पडणार?
चंद्रपुरात RT वन या हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने एक अनोखी शक्कल लढवली.वाघाला जेरबंद करण्यासाठी चक्क पिंजऱ्यामध्ये वनविभागाचे कर्मचारी बसवले. मात्र यावरुन वाद निर्माण होऊ शकतो.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील RT वन या हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लावली आहे. वाघावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी चक्क एका पिंजऱ्यामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांना बसविण्यात आले असून त्यांची संध्याकाळी 6 ते सकाळी 8 अशी ड्युटी लावण्यात आली आहेत. मात्र अशा प्रकारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना का बसविण्यात आले? या मागे वेगळंच कारण समोर आलं आहे.
RT वन या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने एका पुलाखाली अस्थायी पिंजरा तयार केला आहे. राजुरा ते जोगापूर परिसरात असलेल्या एका नाल्यातून हा वाघ अनेक वेळा जातांना दिसला आहे. त्यामुळे या पुलाखालीच एक अस्थायी पिंजरा तयार करून त्यात हा वाघ अडकेल असा वनविभागाचा प्रयत्न आहे. पण हा पिंजरा अस्थायी असल्यामुळे आणि यात ऑटो लिव्हर नसल्यामुळे वाघ आत गेल्यावर पिंजऱ्याचे दार बंद होणार कसं हा प्रश्न वनविभागासमोर उभा झाला आहे.
त्यावर उपाय म्हणून 30 ते 40 फुटावर एक दुसरा पिंजरा ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये वनविभागाचे 2 कर्मचारी बसून राहतील आणि वाघ पिंजऱ्यात जाताच दोरीच्या मदतीने दार खाली ओढतील. वनविभागाची ही शक्कल जरी नामी असली तरी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे पिंजऱ्यात बसविण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. RT वन हा वाघ अत्यंत हिंस्त्र आहे. त्याने आतापर्यंत 8 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या वाघाला गोळ्या घालण्यासाठी मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे. या राजकीय दबावामुळे वनविभाग वाघाला पकडण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. पण यामुळे नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बिबट्या विहिरीत पडला वा वाघ जखमी अवस्थेत आहे. अशावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी मनुष्याला पिंजऱ्यात बसवून जवळ नेले जाते. त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करणे सहज शक्य होते. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात एका जखमी वाघाची जवळून माहिती घेण्यासाठी हा प्रयोग केला होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.