चिपळूण : भारतीयांचा लाडका खेळ असणाऱ्या क्रिकेटचं वेड भारतीयांना मागील बरीच दशकं आहे. जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि रोमहर्षक खेळांपैकी एक असणारा हा खेळ लहाणग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यानांच आवडतो. आंतरराष्ट्रीय सामन्यांसह स्थानिक असे बरेच क्रिकेटच्या स्पर्धा असतात. पण अगदी छोट्या गावांसह सर्वच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या जातात. क्रिकेटचे बरेच नियम देखील आहेत. पण अनेकदा लोकल ठिकाणी खेळताना स्पर्धांचे नियम हवे तसे बदलले देखील जातात.
आधी एकदिवसीय क्रिकेटनंतर आता टी20 तर अगदी टी10 आणि 100 चेंडूचे सामनेही खेळवले जातात. भारतात सुरु झालेल्या आयपीएलने तर टी20 क्रिकेटचं वेड साऱ्या जगाला लावलं. पण आता महाराष्ट्राच्या कोकणात काही अजब नियम असणारा क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे. या खेळाचा नवीन ट्रेंड कोकणातील ग्रामीण भागात पाहायला मिळाला. चिपळूणमध्ये सुरु असलेल्या गोल पोस्ट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अवघे पाच खेळाडू एका संघात असून विशेष म्हणजे या सामन्यात यष्टीरक्षकच नसतात. यष्टीरक्षक उभा असणाऱ्या ठिकाणी एक गोलपोस्टप्रमाणे नेट लावण्यात येतं.
दरम्यान या भन्नाट स्पर्धेची कल्पना कोयना प्रकल्पातील निवृत्त अभियंता चिपळूणचे सुपुत्र भरत माने यांनी आणली आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणारे अनेकजण कायम विविध स्पर्धा खेळतात. पण 11 खेळाडूंच्या संघात प्रत्येकाला फलंदाजी किंवा गोलंदाजीची संधी मिळतेच असं नाही. त्यामुळे ज्यांना अशा प्रकारे संधी मिळत नाही त्यांच्यासाठी अकरा खेळाडूंचा संघ 50 टक्क्यावर आणून अवघ्या पाच खेळाडूंचा संघ करून क्रिकेट सामना खेळवण्याची नवीन संकल्पना समोर आणली असून ती यशस्वीही झाली आहे.
काय आहे नेमकी स्पर्धा?
चिपळूणातील सावर्डे येथे ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत विशेष गोष्ट म्हणजे अवघ्या पाच खेळाडूंचा एक असे दोन संघ या स्पर्धेत सामने खेळले. यावेळी संघात यष्टीरक्षक देखील नाही. यष्टिरक्षकाच्या ठिकाणी गोल पोस्ट स्टॅंड स्टंम्प्सच्या पाठीमागे लावले जाते. ज्यामुळे मागे चेंडू न जाता तो त्या जाळ्यात अडकला जाईल. विशेष म्हणजे यात एक नवा नियम म्हणजे फलंदाज धावा काढताना क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टम्पवर फेकून मारल्यास चेंडू स्टम्पच्या जागी गोलपोस्टला लागल्यास खेळाडू बाद असून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाच धावा देखील कमी केल्या जातात. शिवाय हा सामना केवळ 3-3 षटकांचा असल्याने सामना रंगतदार स्थितीत येतो. शेवटच्या षटकापर्यंत तीन फलंदाज बाद झाले असल्यास मैदानात असलेल्या फलंदाजाने पहिले दोन चेंडू खेळून शेवटचे चार चेंडू स्ट्राइकला असलेल्या फलंदाजानेच खेळायचे, असा नियमही याठिकाणी आहे. तर असा हा अजब ट्रेण्ड भविष्यात आणखी प्रसिद्ध होईल का? हे पाहावे लागेल.
हे ही वाचा -
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- PKL 2021 Live Streaming: बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha