IPL 2022 Player Auction List Announced: केंद्रीय अर्थसंकल्पावर देशभरात चर्चा रंगलेली असताना, बीसीसीआयनं आयपीएलच्या मेगा लिलावासाठी 590 देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. आणि त्या शर्यतीची स्टार्टिंग लाईन ही आयपीएलचा मेगा लिलाव असणार आहे. हा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत संपन्न होणार आहे.
आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचाईझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल. आणि तोच असणार आहे आयपीएलचा मेगा लिलाव. या लिलावासाठी प्रत्येक फ्रँचाईझीच्या हाताशी त्यांच्या बटव्यात विशिष्ट रक्कम आहे.
यंदाच्या नव्या संघबांधणीच्या निमित्तानं प्रत्येक फ्रँचाईझीला 90 कोटी रुपयांची ठराविक रक्कम देण्यात आली होती. बहुतेक फ्रँचाईझींनी त्यापैकी निम्मी रक्कम ही बिनीच्या तीनचार शिलेदारांना आपल्याकडे रिटेन करण्यासाठी किंवा आपल्या ताफ्यात सामावून घेण्यासाठी खर्च केले आहेत. बिनीच्या त्याच तीनचार शिलेदारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक फ्रँचाईझीला मेगा लिलावात नव्यानं संघबांधणी करण्याची संधी मिळणार आहे. या मेगा लिलावासाठी नोंदणी करण्यात आलेल्या 590 देशीविदेशी खेळाडूंपैकी 228 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे, तर 355 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. तसंच उर्वरित सात खेळाडू हे आयसीसीचे सहसदस्य असलेल्या देशांचे आहेत.
आयपीएलच्या या मेगा लिलावात भारताच्या श्रेयस अय्यर, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, ईशांत शर्मा, उमेश यादव या शिलेदारांना चढ्या भावात विकत घेण्यासाठी फ्रँचाईझींमध्ये चुरस पाहायला मिळाले. परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये फाफ ड्यू प्लेसी, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेण्ट बोल्ट, क्विन्टन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन आणि वानिन्दू हसरंगा या नावांवर दौलतजादा होण्याची चिन्हं आहेत. तसंच देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पंड्या, शाहरुख खान, दीपक हुडा, आवेश खान, यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवीकुमार, अंगक्रिश रघुवंशी या उदयोन्मुख खेळाडूंना विकत घेण्यासाठीही फ्रँचाईझी उत्सुक असतील.
आयपीएलच्या मेगा लिलावासाठी नोंदणी झालेल्या 48 खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याखालोखाल वीस खेळाडूंची मूळ किंमत ही दीड कोटी रुपयांच्या, तर 34 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी रुपयांच्या घरात आहे.
कोणत्या फ्रँचाईझीच्या ताफ्यात कोणते शिलेदार? फ्रँचाईझींच्या बटव्यात किती रक्कम आणि किती खेळाडूंची गरज
चेन्नई सुपर किंग्स
बिनीचे शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
दिल्ली कॅपिटल्स
बिनीचे शिलेदार– रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एनरिच नॉकिया (6.5 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 47.5 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
कोलकाता नाईट रायडर्स
बिनीचे शिलेदार– आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 6
लखनौ सुपर जायंटस
बिनीचे शिलेदार– लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 59 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
मुंबई इंडियन्स
बिनीचे शिलेदार– रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 48 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 21, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
पंजाब किंग्स
बिनीचे शिलेदार– मयांक अगरवाल (12 कोटी), अर्शदीपसिंग (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 72 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 23, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 8
राजस्थान रॉयल्स
बिनीचे शिलेदार– संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी) यशस्वी जैस्वाल (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 62 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बिनीचे शिलेदार– विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)
बटव्यातली शिल्लक– 57 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
सनरायझर्स हैदराबाद
बिनीचे शिलेदार– केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)
बटव्यातली शिल्लक – 68 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
टीम अहमदाबाद
बिनीचे शिलेदार– हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (आठ कोटी)
बटव्यातली शिल्लक – 52 कोटी रुपये, संघातल्या मोकळ्या जागा– 22, परदेशी खेळाडूंसाठी मोकळ्या जागा– 7
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha