(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी आरक्षण मगच शिक्षण! शाळा सोडून विद्यार्थी आंदोलनात; म्हणाले, आता आरक्षण घेऊनच जाणार...
Maratha Reservation : विशेष म्हणजे काही विद्यार्थी देखील आंदोलनात आले असून, आधी आरक्षण मगच शिक्षण अशी त्यांची भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या (Mumbai) दिशेने काढलेल्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या रोज वाढत आहे. या आंदोलनात मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भातील मराठा समाजबांधव सहभागी होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थी देखील आंदोलनात आले असून, आधी आरक्षण मगच शिक्षण अशी त्यांची भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील आंदोलक त्यांच्या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, याच आंदोलनात बीड जिल्ह्यातील एक कुटुंब पहिल्या दिवसांपासून सहभागी झाले आहेत. या कुटुंबाने स्वतःची चारचाकी गाडी आणली आहे. ज्यात राहण्याची आणि खाण्या-पिण्याची देखील सर्व सोय आहे. आंदोलनाला उशीर झाल्यास अन्नधान्य कमी पडू नयेत यासाठी त्यांनी एक महिना पुरेल एवढ्या प्रमाणात गरजेचे गोष्टी आणल्या आहेत. तर आता कितीही दिवस लागले तरीही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याची भूमिका या कुटुंबातील महिला आंदोलकांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे या कुटुंबाने शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांना देखील सोबत आणले आहेत. आधी आरक्षण मगच शिक्षण अशी भूमिका या कुटुंबीयाने 'एबीपी माझा'शी बोलून दाखवली आहे.
आरक्षणच नसेल तर शिक्षण घेऊन काय फायदा...
आंदोलनात सहभागी झालेल्या बीडच्या या महिलेने प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,' मी आतापर्यंत मुंबई कशी आहे पहिली नाही. मुंबईला जाण्याची ही पहिलेच वेळ आहे. तसेच, माझा मुलगा देखील माझ्यासोबत आंदोलनात आहे. मुलगा 9 वीच्या वर्गात शिकत आहे. आंदोलनात सहभागी झाल्यावर माझी शाळा बुडेल असा तो म्हणाला. मात्र, मी त्याला म्हणाले की, आधी आरक्षण मगच शिक्षण...कारण आरक्षणच नसेल तर शिक्षण घेऊन काय फायदा आहे. त्यामुळे मी मुलाची शाळा बुडवून त्याला सोबत घेऊन आले असल्याच महिला म्हणाली.
आंदोलनासाठी तरुणाने नवीन गाडीच घेतली...
या आंदोलनात अनेक तरुण देखील सहभागी झाले आहेत. याचवेळी एका तरुण आंदोलकांने प्रतिक्रिया देतांना म्हटले की, पहिल्यांदा मुंबईला जात आहे. सर्व कुटुंब माझं सोबतच आहे. मुंबईला जाण्यासाठी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे मी नवीन गाडी घेतली. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी परतणार नाही. मुंबई आमच्यासाठी नवीन असली तरीही आमच्या मनात कोणतेही भीती नाही. त्यामुळे आता मुंबईतून आम्ही आरक्षण घेऊनच येणार असल्याचे आंदोलक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! हुबेहूब मनोज जरांगे..; पुण्यातील बाप-लेकाने उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा