अपात्रतेच्या भीतीनं मुक्ताईनगरमधील 'त्या' भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश : एकनाथ खडसे
जळगाव मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच अपात्रतेच्या भीतीपोटीच मुक्ताई नगर पंचायतीच्या त्या नगरसेवकांनी पक्षांतर केलं असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

जळगाव : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश आहे. मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.
अपात्रतेच्या भीतीपोटीच मुक्ताई नगर पंचायतीच्या त्या नगरसेवकांनी पक्षांतर केलं असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी बोलतांना खडसे यांनी म्हटलं की, "मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपाच्या तेरा आणि 1 अपक्ष अशी 14 संख्या आहे. यापैकी आज दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. परंतु आज केवळ भाजपाचे चार आणि एक अपक्ष असे पाच नगरसेवकच शिवसेनेकडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी भाजपाची एक नगरसेविका ही तीन अपत्ये असल्याच्या कारणाने अपात्र झालेली आहे. तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या भीतीपोटी तसेच त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही, अशी खात्री संबंधितांनी दिली असल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी आहे." माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथे बोलताना दिली आहे.
दरम्यान, बुधवारी मुक्ताईनगर येथील भाजपाच्या काही नगरसेवकांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, "मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये 13 भाजपचे आणि एक अपक्ष असे एकूण 14 नगरसेवक आहेत. त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त हे धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. कारण माझ्यासोबत 9 नगरसेवक आता हजर आहेत.", असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणारे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी चार नगरसेवक हे भाजपाचे असून त्यापैकी एक अपक्ष आहे. इतकेच नव्हे तर त्या चार भाजपाच्या नगरसेवकांपैकी एक नगरसेविका अपात्र झालेली असून उर्वरित तीन भाजपाचे नगरसेवक हे अतिक्रमण केल्यामुळे अपात्र होणार आहेत. त्याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक जून रोजी होणार आहे. इतकेच नव्हेतर हे नगरसेवक नगराध्यक्ष आंकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. अपात्र होण्याच्या भीतीने आणि त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचवण्याची खात्री संबंधितांनी दिल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे." यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नसल्याचंही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर मी राष्ट्रवादी पक्षातच असल्याचंही यावेळी बोलताना सांगण्यास ते विसरले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का, गटनेत्यासह सहा नगसेवक शिवसेनेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
