कांदे विकून सहा महिने झाले, पैसे मात्र मिळाले नाहीत, शेतकरी थेट दिल्लीत, शरद पवारांना घातले साकडे
नाफेड व एन.सी.सी.एफ.ने खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. याच मुद्यावरुन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
Farmers met Sharad Pawar : नाफेड व एन.सी.सी.एफ.ने खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. याच मुद्यावरुन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. खासदार भास्कर भगरे यांनी शेतकऱ्यांची शरद पवार यांच्यासोबत भेट घालून दिली. नाफेडकडून विकलेल्या कांद्याचे पैसे काढून द्या, म्हणून शेतकऱ्यांनी शरद पवार यांना साकडे घातले.
दरम्यान खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांची केंद्रीय कृषी मंत्र्याशी भेट करून देत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. खासदार भास्कर भगरे यांची आग्रही भूमिका आहे. 15 जून ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत शेतकऱ्यांनी नाफेडला कांदे विकले होते. यामध्ये तब्बल तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. नाफेड एन.सी.सी.एफ.कडे हे पैसे अडकले आहेत.
कोट्यावधी रुपये थकीत
केंद्राच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व 'एनसीसीएफ' या दोन नोडल एजन्सी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तीन लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली. मात्र, सहा महिने होऊनही थकीत 200 कोटी रुपये मिळाले नसल्याने तातडीने सदरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
खरेदी झाल्यानंतर 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा केली होती
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे नाव पुढे करून ग्राहकहितासाठी कांद्याची खरेदी करते. या योजनेअंतर्गत खरेदी झाल्यानंतर 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. एकीकडे मे महिन्यात खरेदी सुरू होणे अपेक्षित होती; मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यांत खरेदी प्रक्रिया उरकण्यात आली. खरेदीनंतर सहा महिने उलटले असून, अद्यापही त्याचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. नाफेड आणि एन.सी.सी.एफ.ने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी थेट दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या प्रकरणात आपण लक्ष घालूव पैसे मिळवून द्यावेत असी विनंती देखील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना यावेळी केली.























