एक्स्प्लोर
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची किल्ली शेतकऱ्यांच्या हातात
शेतकरी सरकारवर नाराज आहे. शेतकरी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लगेच दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेसदेखील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विधानसभा निवडणुकीची रणनिती आखत आहे.
मुंबई : गेल्या महिन्याभरात दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे भाकित केले. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आत्मविश्वासामागचे खरे कारण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेला अपयश आले आहे. राज्यातला शेतकरी सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. त्यातच अधिक भर म्हणून महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करतोय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले नागरिक शिवसेना-भाजपला नाकारतील, असे अंदाज वर्तवण्यात येत होते.
लोकांच्या, राजकीय विश्लेषकांच्या सर्व अंदाजांना बगल देत लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने युती केली. केवळ युतीच केली नाही तर महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागादेखील जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी नव्हता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकींची गोष्ट वेगळी आहे. दोन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे पुढील दोन महिने शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातला पाणीप्रश्न राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची चावी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हातात असेल.
महाराष्ट्रातल्या 36 पैकी 31 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल झाला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दुष्काळापासून दिलासा मिळाला, परंतु अद्याप मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती बदलेली नाही. या भागात चार-पाच दिवस रिमझिम पाऊस पडला. या पावसाने काहीही फरक पडलेला नाही.
विदर्भ-मराठवाड्यात पाण्याची बिकट परिस्थिती आहे. हजारो गावांमध्ये आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पाणी प्रश्नाशिवाय राज्यात शेतकरी कर्जमाफी हादेखील मोठा प्रश्न आहे. पीकविम्यासाठी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले होते. परंतु पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.
राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. या योजनेद्वारे भूजल स्तर वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गेल्या वर्षी आणि यावर्षीदेखील पाऊस खूप कमी पडला. त्यामुळे या योजनेचे मूळ उद्देश साध्य करता आले नाही.
नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे लोकांनी भाजपला मतं दिली. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला विजय मिळाला. त्याचबरोबर विदर्भ-मराठवाड्यात भाजपकडे असणाऱ्या मोठ्या चेहऱ्यांमुळे मतदारांना भाजपला झुकतं माप दिलं.
परंतु या गोष्टी विधानसभा निवडणुकीत कामी येणार नाहीत. कारण शेतकरी सरकारवर नाराज आहे. शेतकरी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेसदेखील अशी रणनिती आखत आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे शेतकऱ्यांना भेटत आहेत. स्वतः मुख्यमंत्रीदेखील भाजपकडून महाजनादेश यात्रेवर जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement