मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

Sadabhau Khot : हिंदी (Hindi) भाषेच्या सक्तीविरोधात येत्या 5 जुलैला मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray group) वतीन भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) एकत्र येणार आहेत. मात्र, यावरुनच शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दोघा भावांना फटकारले आहे. मराठी भाषा धोक्यात आली नाही तर यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत, अशी टीका खोतांनी केलीय. तुमची लेकरं कोणत्या शाळेत शिकली? त्याची नावे आम्हाला सांगा असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. सदाभाऊ खोत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ठाकरे बंधूंना फटकारले.
माझ्या लेकराला हिंदी इंग्रजी आलं पाहिजे,
प्रत्येकांचा अजेंडा ठरलेला आहे. मात्र, एक दुर्दैवाची बाब शेतकऱ्यांचा अजेंडा राजकारण्यांच्या दिशेने चाललेला दिसत नाही. मराठी भाषेच्या अजेंड्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र, शेतकऱ्यांचा देखील अजेंडा असला पाहिजे होता. पोटाची भूक माणसाला भाषा शिकवत असते, आमची मराठी भाषा चिरकाल टिकणार आहे असे खोत म्हणाले. मराठी भाषेवर आक्रमण हा ढोंगीपणा आहे. माझ्या लेकराला हिंदी इंग्रजी आलं पाहिजे, कारण मला जगाबरोबर चालायचे असेल तर ती भाषा आली पाहिजे असे खोत म्हणाले.
तुमची लेकरं कोणत्या मराठी भाषेत शिकली? खोतांचा ठाकरेंना सवाल
आमच्या लेकरांना हिंदी इंग्रजी आलं नाही पाहिजे, याचं कारण म्हणजे भाषेचा दारिद्र्य. आमच्या लेकरा बाळात असलं पाहिजे कारण त्यांना जग समजता कामा नये असे म्हणत खोतांनी विरोधकांवर टीका केली. जग केवळ यांना समजता आलं पाहिजे. जे आज आंदोलन करत आहेत त्यांना माझा साधा प्रश्न तुमच्या लेकरांना इंग्रजी येते का? विमानात बसल्यावर तुमची मुलं इंग्रजीत बोलतात ना? तुमची लेकरं कोणत्या मराठी भाषेत शिकली त्यांची नावे आम्हाला सांगा? असे सवाल सदाभाऊ खोतांनी उपस्थित केले. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे आम्ही दर्शन घेऊ. कारण त्यांची लेकरं फडफड इंग्रजी बोलायला लागली आहेत. तुमची लेकरं चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार जगात जाणार वेगवेगळे देश फिरणार आणि इथे येऊन तुम्ही सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये.
मराठी भाषा जपली भारतातल्या गावगाड्यातील माणसांनी
मराठी भाषा जपली भारतातल्या गावगाड्यातील माणसांनी म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली आहे. पारंपारिक मराठी भाषेचं संगीत वाजवत वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. तुम्हाला जर मराठी भाषा जपायची असेल तर पंढरीच्या वारीला या असे खोत म्हणाले. इंडियात बसायचं आणि मराठी धोक्यात आलं असं म्हणायचं. धोक्यात त्यांच्या खुर्च्या आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी धोक्यात आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे असे खोत म्हणाले. लाखो लोक दिंडीत सहभागी होऊन मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहेत? असा सवाल खोतांनी केला. इंग्रजी माझ्या मुलाने का शिकू नये? असा सवाल खोतांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
























