पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचं आंदोलन, उद्यापासून अन्नत्याग
किसान क्रांतीच्या बॅनरखाली ही आंदोलन छेडण्यात आलं असून, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकीता या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. 3 जून 2017 रोजी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही.
शिर्डी : पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुली आता आंदोलनाला बसणार आहेत. उद्यापासून या कृषीकन्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला 50 रुपये प्रतिलीटर भाव द्या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
किसान क्रांतीच्या बॅनरखाली ही आंदोलन छेडण्यात आलं असून, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकीता या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. 3 जून 2017 रोजी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही.
पुणतांबा गावातून 'देता की जाता' असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे पुणतांबामधील कृषीकन्याही आक्रमक झाल्या आहेत. या मुली उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे. सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणारी तरुणी निकीताने केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही लोकपालसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
पुणतांबा गावातील युवतींनी एकत्र येत किसान क्रांतीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दीड वर्षपूर्वी शेतकरी संपाची मशाल याच पुणतांबा गावात पेटली होती.