एक्स्प्लोर
फडणवीस अद्यापही 'वर्षा' बंगल्यातच; तीन महिन्यांची वाढवली मुदत
राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वर्षा निवासस्थान सोडावे लागणार आहे. मात्र, त्यांनी 3 महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तेथेच आहे.
मुंबई : सर्व पक्ष सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानं राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परिणामी मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. काही माजी मंत्र्यांनीही बंगले सोडण्याची तयारी सुरु केली असली तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यातच मुक्कामाला आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांनी 3 महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तेथेच आहे.
भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोर मंत्र्यांच्या बंगल्यांवर सामानाची बांधाबांध सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता 'वर्षा' हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत. या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील संगणक, झेरॉक्स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आले आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात शुकशुकाट आहे. दुसरीकडे, 'वर्षा' या निवासस्थानी त्यांचा अजून काही दिवस तरी मुक्काम आहे. शासकीय नियमानुसार बंगला सोडण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला 3 महिन्यांचा अवधी मिळतो.
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा -
मुख्यमंत्री पदावरुन भाजपशी बिनसलेल्या शिवसेनेने सध्या आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. एकमेकांच्या विरोधी भूमिका घेणारे पक्ष एकत्र आल्यामुळं सत्तास्थापनेला विलंब होत आहे. सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, सत्तास्थापनेत अजून अवधी लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना बोलताना दिली. तर दुसरीकडे सरकार आमचेच येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असल्याची वक्तव्ये भाजपकडून करण्यात येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement