रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावे
अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आले आहे. बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधिक्षक, मनोज पाटील यांनी दिली आहे. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पाटील म्हणाले, आत्तापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती.
रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. मात्र 30 नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली.