(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणतांबा ऐतिहासिक शेतकरी संप करणाऱ्या गावात आता वृक्ष बँकेची स्थापना; वृक्ष लागवडीसह संवर्धनासाचा प्रयोग
वृक्ष बँकेत नागरिकांनी बियाणे घेण्यासाठी पैसे गुंतवल्यावर त्याच पैशातून त्या व्यक्तीच्या नावे सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून झाड लावले जाईल.
शिर्डी : ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची हाक देऊन यशस्वी करणाऱ्या पुणतांबा गावातून आता वृक्ष बॅंक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धनासाठी हा उपक्रम फायद्याचा असून अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री वनराई संस्थेचे मोलाच सहकार्य लाभणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पुणतांबा गावात वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली आहे. पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे यांनी सह्याद्री देवराई या संस्थेच्या सहकार्यातून गांधी जयंती निमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या वर्षी 75 हजार वृक्ष लागवडीचं ध्येय समोर घेत या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे.
ज्या पद्धतीने नागरिक बँकेत पैसे जमा करतात व याचा फायदा त्याला भावी आयुष्यात होतो, तशाच पद्धतीने या वृक्ष बँकेत नागरिकांनी बियाणे घेण्यासाठी पैसे गुंतवल्यावर त्याच पैशातून त्या व्यक्तीच्या नावे सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून झाड लावले जाईल. तसेच वेळोवेळी त्या व्यक्तीला त्या वृक्षाच्या वाढीची माहिती देत त्याने गुंतवलेल्या पैशातून समाजाला व निसर्गाला किती फायदा होतो हे समजून सांगितले जाणार आहे.नी
राज्यात ठिकठिकाणी अनेक छोट्या मोठ्या बँक निर्माण झाल्या मात्र कोरोना काळात ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू पाहता वृक्ष लागवडीच महत्व सर्वसामान्य व्यक्तीला समजलं आहे. पुणतांबा गावात सुरू झालेली वृक्ष बँक जर राज्यभर सुरू झाल्या तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठं यश मिळेल हे मात्र नक्की.