Eknath Shinde : 'अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली', उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून शिंदे यांचं उत्तर
Eknath Shinde Speech : शिवसेनेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला, ज्यानंतर दिल्लीमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
Eknath Shinde Speech in Delhi : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी (BMC Election) सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. नुकताच मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. ज्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का? असा खोचक प्रश्न विचारत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
एकनाथ शिंदे यांनी राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याठिकाणी त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटप्रमुख मेळाव्यावर जहरी टीका केली. सर्वात आधी अडीच वर्ष गटप्रमुखांची आठवण झाली नाही, आता गटप्रमुखांना अच्छे दिन आले, असं म्हणत उद्धव यांना टोला लगावला. महाविकास आघाडीच्या स्थापनेचा निर्णय कसा चूकीचा होता, हे शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जवळपास सर्वच टीकांना सडेतोड उत्तरही दिलं.
'तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी?'
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना, आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात केला होता. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, 'आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक प्रश्न विचारला.
शिवसैनिकांवर विश्वास नाही?
आज पार पडलेल्या गटप्रमुख मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आलं. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसैनिकांवर विश्वास नाही. म्हणून अशाप्रकारे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचं ते म्हणाले.
'मी समाजाचा विकास करण्याचं कंत्राट घेतलं आहे.'
एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं जात असल्याने यावर बोलताना शिंदे म्हणाले, हो मी शेतकऱ्यांचं भलं करण्याचं, समाजाचा विकास करण्याचं कंत्राट घेतलं आहे. असं बोलत टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर शिंदे यांनी दिलं आहे.
हे देखील वाचा-