Eknath Shinde : शिवसेनेतील अनेक आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकनाथ शिंदेंनी केलं शिक्कामोर्तब
Eknath Shinde : शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
Eknath Shinde : शिवसेना पक्षात प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी आम्ही अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला आहे आणि हा आमच्या पक्षाचा निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रीपद मिळावं असा मानस उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा होती. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session 2024) चहापानाच्या कार्यक्रमानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी यावर भाष्य केलं आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझासोबत बोलताना यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. तसेच आम्ही काम केलं नाही आणि शिंदे साहेबांनी सांगितलं तर दोन महिन्यांतही मुख्यमंत्रीपद सोडू असंही ते म्हणाले होते. त्यामुळे शिंदे गटात मंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे की नाही हा संभ्रम होता. पण एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर तो संभ्रमही आता दूर झाला असून शिंदे गटात मंत्रीपद हे केवळ अडीच वर्षांसाठीच असणार आहे.
एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं?
अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेकांमध्ये मंत्री होण्याची क्षमता असते, अनेकांची इच्छा असते. नाहीत असंही नाहीये.याचसाठी आमच्या पक्षाने एक निर्णय घेतलाय. मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल. यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे. यामुळे अनेकांना संधी देता येईल. माझी भूमिका स्पष्ट आहे, जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे. जो काम करेल त्याला संधी मिळेल.
गेल्यावेळी हुकलेल्या मंत्रीमंडळाच्या यादीत यंदा अनेकजण आपल्या नावाची प्रतीक्षा करत होते. अडीच वर्षांच्या या फॉर्म्युल्यामुळे अद्यापही ती प्रतीक्षा कायम आहे, असंच म्हणावं लागेल. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात होणार नाही, काही मंत्रिपदे पुढील विस्तारासाठी राखून ठेवली जातील. त्यातच आता अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे यंदाच्या मंत्रीमंडळात अनेकांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बातमी वाचा :
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ