एक्स्प्लोर
Advertisement
विधानसभेत सर्व विरोधक खडसेंच्या बाजूने, भाजप आमदारांची चिडीचूप!
सुरेश भोळे यांनी स्वतः याविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने एकनाथ खडसेंनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सभागृहातील या परिस्थितीत सर्व विरोधक आमदार एकनाथ खडसेंच्या बाजूने उभे राहिले.
नागपूर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी? याची चौकशी करा, असं पत्र भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवरुन हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलं. मात्र सुरेश भोळे यांनी स्वतः याविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने एकनाथ खडसेंनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
सभागृहातील या परिस्थितीत सर्व विरोधक आमदार एकनाथ खडसेंच्या बाजूने उभे राहिले. तर भाजप आमदार शांतपणे सर्व परिस्थिती पाहत होते. अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी बाहेर जाऊन जळगावच्या पोलीस अधीक्षकांना एफआयआर दाखल करुन घेण्यासाठी फोन केला.
''विनाकारण मानसिक छळ आणि बदनामीचा प्रयत्न''
''भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडचा वापर करून माझ्या चौकशीची मागणी करणारी 500 पत्र कुणीतरी पाठवली. सुरेश भोळेंचाच मला फोन आला हे पत्र मी लिहले नाही. मग हा प्रकार कुणी केला त्याची चौकशी करावी,'' अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.
''हे साधेसुधे प्रकरण नाही, यामागे असा कुणीतरी व्यक्ती आहे जो दुखावला गेला आहे. पत्र वाचून संकेत एका बाजूला जातात. विनाकारण मानसिक छळ आणि बदनामी करण्याचा प्रयत्न आहे,'' असंही खडसे म्हणाले.
''मी 40 वर्षे सार्वजनिक जीवनात काम करतोय. 38 वर्षे माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण या दोन वर्षातच असं का घडतंय? माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र आहे. मी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलो पण पोलीसांनी एफआयआर घेतली नाही,'' असं म्हणत खडसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
''यापूर्वी माझ्या नावे 9.5 कोटी आणि 10 कोटींचे बनावट धनादेश काढले गेले. त्याबाबत मी तक्रार करायला गेलो तर पोलिसांनी एफआयआर दाखल केले नाही. त्यानंतर मी त्याबाबत कोर्टात गेलो, कोर्टाच्या आदेशाने यात चौकशी होऊन आरोपींना अटक झाली,'' असंही खडसे म्हणाले.
विरोधकही मैदानात
एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ विरोधक आमदारही मैदानात उतरले. ''एका ज्येष्ठ सदस्याबाबत असा गंभीर प्रकार होतो आणि पोलीस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. एकनाथ खडसे यांनी तक्रार दिली तरी पोलिसांकडून एफआयआर दाखल करून घेतली जात नाही. आजच अध्यक्षांनी पोलीस अधीक्षकांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत,'' अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली.
एकनाथ खडसे यांच्या तीव्र नाराजीनंतर आणि त्यांनी सर्व घटना सांगितल्यानंतर विरोधी आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
एफआयआर दाखल करण्याचे आदेश
आमदारांनी तक्रार केल्यानंतरही पोलीस एफआयआर दाखल करून घेत नाहीत हे गंभीर आहे, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पोलीसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
एसपीला आत्ताच्या आत्ता फोन लावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले. अध्यक्षांच्या आदेशानंतर गिरीष बापट काम सोडून बाहेर गेले आणि त्यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना फोन केला.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती कशी आली, याची चौकशी करा, असं पत्र मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलं.
विशेष म्हणजे, मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आलेलं हे पत्र जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याच लेटरहेडवरुन पाठवण्यात आलं. मात्र आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून आपल्याला आणि खडसेंना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला.
याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. मात्र सुरेश भोळे यांनी स्वतः तक्रार दाखल करुनही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे विधानसभेत एकनाथ खडसेंचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement