(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील पहिले किसान एअरपोर्ट पंढरपूरला करण्यासाठी प्रयत्न, हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत लवकरच बैठक : खा. रणजितसिंह निंबाळकर
सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि कर्नाटकमधील काही जिल्ह्यातून शेतीमालाची वाहतूक येथून शक्य होणार आहे. याबाबत भाजप पदाधिकारी संतोष पाटील यांनी ही मागणीसाठी पंतप्रधान कार्यालयापासून सर्वत्र पत्रव्यवहार केला होता.
सोलापूर : सोलापूरमधील बोरमानी विमानतळ गेले अनेक वर्षे रखडले असून आता पंढरपूर येथे देशातील पहिले किसान एअरपोर्ट उभे करावी अशी मागणी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी केली आहे. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्याला मध्यवर्ती ठिकाण असून येथे देशभरातून कोट्यवधी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. याच पद्धतीने हा परिसर बागायत असल्याने डाळिंब , द्राक्षे , केली , बेदाणे यांच्यासह ताज्या भाज्या येथून देशभर जलद गतीने वितरित करणे सोपे असल्याने पंढरपूर येथे विमानतळ बनविण्याची मागणी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला केली होती . त्यानुसार पुढील महिन्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.
सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि कर्नाटकमधील काही जिल्ह्यातून शेतीमालाची वाहतूक येथून शक्य होणार आहे. याबाबत भाजप पदाधिकारी संतोष पाटील यांनी ही मागणीसाठी पंतप्रधान कार्यालयापासून सर्वत्र पत्रव्यवहार केला होता. त्याला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर आता खासदार निंबाळकर आणि संतोष पाटील यांना केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी वेळ दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब, मेंढापूर परिसरातील माळरानावर हे विमानतळ करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालखी मार्ग उद्घाटन सोहळ्यात पंढरपूरचा चौफेर विकास करण्याची घोषणा केली होती. आता त्यासाठी देशभरातील भाविक आणि या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे देशातील पहिले किसान एअरपोर्ट बनविण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सोलापूर येथील बोरामणी विमानतळाचे काम गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रखडले आहे. यातच हे ठिकाण एका कोपऱ्यात असल्याने यापेक्षा पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे हे विमानतळ करावे अशी मागणी संतोष पाटील यांनी केली होती. बोरामणी येथे मोठी औद्योगिक वसाहत उभी करून विमानतळ पंढरपूरला हलविण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.
सध्या मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली किसान रेल गेल्या काही महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे निदर्शनास आले. या रेल्वेसाठी अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून 50 टक्के अनुदान दिले जात होते . त्याची मुदत संपल्याने ही रेल्वे बंद असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. आता ही मुदत वाढवण्यासाठी पुरवणी मागण्यात आर्थिक नियोजन करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे करणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. सांगोला भागातून जाणारे डाळिंब, खरबूज, शिमला मिरची ला देशभर मोठी मागणी असून किसान रेल मधील जवळपास 50 टक्के माल हा सांगोला भागातून जात होता. आता लवकरच पुन्हा ही किसान रेल देखील सुरु होईल असे निंबाळकर यांनी सांगितले.