कोणत्याही वर्गाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका: उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा आरक्षणाच्या निकालावर अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस दिलीप भोसलेच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं.
बारामती : कोणत्याही वर्गाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे, जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती राज्य सरकार घेतंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या निकालावर अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस दिलीप भोसलेच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे, राजकारण न आणता न्याय मिळवून देणाऱ्यांसोबत सरकार आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
राज्यातील लॉकडाऊनसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "कॅबिनेटमध्ये असं ठरलेलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साधारणत 36 जिल्ह्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा. आता कॅबिनेटने सगळ्यांनी तशा पद्धतीने सांगितल्यानंतर निर्णय झालेला असेल तर तुम्हीच मला सांगा. मी काय अजून चौकशी केलेली नाहीये."
पुणे लॉकडाऊन शिथिल करायचा का नाही यावर पूर्व विचार केला जाईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
वास्तविक ज्या त्या भागातले पेशंट ज्या त्या भागात गेले तर ते डॉक्टरांना उपचार करण्याकरता सोपं जातं असं सांगत अजित पवार म्हणाले की, "पुण्याच्या परिसरात देखील आपण बघतोच खूप मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या भागातून लोकं त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात. महाराष्ट्रातला कुठलाही पेशंट असला तरी त्याला उपचार घेण्याकरता कोणत्याही सरकारी किंवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुठल्याही रुग्णाला ट्रीटमेंट नाकारु शकत नाही. प्रत्येक रुग्णाला ट्रिटमेंट मिळाली पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे."
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता घेऊन राज्य सरकार तशी तयार करत असल्याचं अजित पवार म्हणाले. लहान मुलांना लागणारे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं.
कोरोना लस खरेदी करण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ज्या कंपन्या लस तयार करतात त्यांच्याकडून पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले का झोपेत असताना बोलले हे समजत नाही. ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आले आहे तेव्हापासून त्यांना असह्य झालं आहे. आपण सरकारमध्ये नाही याची त्यांना बोचणी लागली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठं जाऊ नये म्हणून पुडी सोडण्याचे काम करीत आहे. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत या सरकारला काही होणार नाही.
महत्वाच्या बातम्या :