एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळाची दाहकता : 'धरण उशाला आणि कोरड घशाला', पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फेलोशिपअंतर्गत दत्तक घेतलेल्या 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार हे दोन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. अनेक गावकऱ्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री पाणीटंचाई आणि दुष्काळाचे निवारण करण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिपअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.
जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिपअंतर्गत दत्तक घेतलेल्या पाथर्डी आणि रामकुंड या दोन गावांमध्ये अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात नसून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न या गावांमध्ये निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या जव्हार तालुक्यातील पाथर्डी या ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत पाथर्डी आणि रामकुंड ही दोन गावं आहेत. मात्र या दोन्ही गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तासनतास विहिरीच्या कट्ट्यावर बसून राहावे लागत आहे.
गावात असलेल्या सर्वच विहिरी, नाले, बोअरवेल यांनी तळ गाठला असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मात्र या तहानलेल्या गावांकडे शासन आणि प्रशासन या दोघांनाही लक्ष द्यायला वेळ नाही.
पाथर्डी ग्रुप ग्रामपंचायतीमधील विहिरींना पाणी असून पाथर्डी या मुख्य गावात विहिरीत असलेलं पाणी हे अतिशय निकृष्ट , गाळयुक्त असं गढूळ असून नाईलाजास्तव याच पाण्याचा ग्रामस्थांना पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. या गढूळ पाण्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले असून वृद्ध तसंच लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे गढुळ पाणी पिण्याशिवाय या ग्रामस्थांकडे पर्याय उरलेला नाही.
गावाच्या वरच्या बाजूस एक धरण आहे तिथे पाणीसाठाही आहे. तर खालच्या बाजूला दत्तक योजनेअंतर्गत विहिरीचे काम पूर्ण झालं मात्र ती निकृष्ट कामामुळे कोसळून पडली आहे. आता पुन्हा ह्या विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे.
गावांजवळ पाणी असूनदेखील अनेक वर्षे नियोजन आणि दुर्लक्ष असल्या कारणाने या गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फेलोशिपअंतर्गत दत्तक घेतलेल्या 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement