सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवर बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश
कर्णकर्कश डॉल्बी-डीजेविरोधात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळं गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम आणि 'लेझर लाईट शो'वर बंदी घालण्यात आली आहे.
सोलापूर : मागील 15 दिवसापासून डॉल्बी मुक्तीसाठी सोलापूरकरांनी दिलेल्या लढ्याला काही अंशी यशस्वी आलं आहे. कर्णकर्कश डॉल्बी-डीजेविरोधात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळं गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम आणि 'लेझर लाईट शो'वर बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केला आहे.
डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळं लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्या विरोधात सोलापुरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु होते. याचं आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी डॉल्बीवर बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान सोलापूर शहरात अद्याप अशा पद्धतीचा कोणताही आदेश निघालेला नाही. शिवाय हा निर्णय केवळ गणेशोत्सवपुरता निघाल्याने नागरिकांकडून वर्षभर डॉल्बीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बंदी असावी अशी मागणी करण्यात येत आहे. सणात उत्सवात आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सवांत मिरवणुकीसह इतर समारंभासाठी प्रखर दिव्यांचा वापर (लेझर बीम), कर्णकर्कश डिजेचा सर्रास वापर केला जातो. अनेक सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवाली आहे. डीजे सुरू असताना अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढल्याचे प्रकारही वारंवार निर्दशनास येतात. त्याचबरोबर डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अतितीव्र ध्वनी लहरींमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होतात.
ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात. तसंच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात वावरलं तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरं होण्याची शक्यता असते. "मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जितका जास्त काळ हा आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. अनेकदा कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाशा गुणगुणल्यासारखे आवाज येतात. याला टीनीटस असं म्हणतात. ही परिस्थिती तात्पुरती असू शकते किंवा कायमस्वरूपीही. मोठ्या आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे किंवा कानाचे त्रास टाळता येण्यासारखे आहेत.
महत्वाच्या बातम्या:

























