अकोल्यात रद्दीच्या दानातून साजरी होणार 'संवेदने'ची दिवाळी
सामाजिक कार्यकर्ते 'पुरूषोत्तम शिंदे' यांचा १३ वर्षांपासून उपक्रम. समाजाकडून जमा केलेल्या रद्दीतून साजरी होते वंचितांची दिवाळी.
Akola : रद्दी ही वृत्तपत्र वाचणाऱ्या प्रत्येक घरातील नेहमीची अडगळ असते. मात्र,अकोल्यात हिच रद्दी गेल्या १६ वर्षांपासून संवेदना आणि माणुसकीची 'समृद्ध अडगळ' बनली आहे. याला कारण आहे एक जगावेगळा उपक्रम. हा उपक्रम आहे गरीब-वंचितांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पेरण्याचा. लोकांकडून रद्दी जमा करायची, जमा झालेली रद्दी विकून त्या पैशांत गरीब, वंचितांना दिवाळीचा फराळ, कपडे आणि मिठाई दिली जाते. हा उदात्त हेतू मांडून गेल्या सोळा वर्षांपासून अकोल्यात ही चळवळ राबविणाऱ्या संवेदनशील माणसाचं नाव आहे पुरूषोत्तम शिंदे. सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये कृतीशील आणि तेवढ्याच संवेदनशील पठडीतला कार्यकर्ता म्हणजे पुरूषोत्तम शिंदे. ते आपल्या 'स्वराज सामाजिक संस्थे'च्या वतीने हा सामाजिक उपक्रम दर दिवाळीत सातत्याने राबवित आहेत.
दिवाळी आली की प्रत्येक घरी लगबग असते ती आपल्या घराच्या साफसफाईची. या साफसफाईत घरातील अडगळीच्या वस्तू, भंगार आणि रद्दी बाहेर काढली जाते. वर्षभरातील सर्वाधिक रद्दीची विक्री दरवर्षी दिवाळीच्या महिन्यातच होते. अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम शिंदे यांच्या लक्षात ही गोष्ट आली. आणि यातूनच १६ वर्षांपुर्वी जन्माला आली माणुसकीचा जागर करणारी एक शाश्वत चळवळ आणि विचार. ही चळवळ होती लोकांच्या घरातील रद्दीतून गरिबांची दिवाळी साजरी करण्याची. पुरूषोत्तम यांनी हा विचार आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखविला. मात्र, अनेकांनी लोक रद्दी देतील का?, रद्दी घरोघरून कशी जमा करणार?, असे प्रश्न विचारत ही गोष्ट हसण्यावर नेली. मात्र, पुरूषोत्तम यांनी हे काम निष्ठेनं आणि नेटाने पुढे नेण्याचा निश्चय केला. २००५ साली या जगावेगळ्या उपक्रमाची सुरूवात झाली. पहिल्या वर्षी पुरूषोत्तम यांच्यासोबत फारसे कोणी सोबत नव्हतं. मात्र, जशी-जशी वर्ष उलटत गेलीत तशी-तशी या उपक्रमाची क्षितीजं विस्तारत गेली. आज तर हा विचार अकोलेकरांची आपली चळवळ आणि उपक्रम झाला आहे. दिवाळी आधीच्या महिनाभरापासून या उपक्रमाला सुरूवात होते. अकोल्यातील काही ठराविक रद्दी संकलन केंद्रावर लोक स्वत: रद्दी आणून देतात. आज सर्वसामान्य अकोलेकरांसह शहरातील अनेक शाळा, संस्था या विचारांशी जुळल्या आहेत. सध्या अकोल्यात या रद्दी संकलनाला सुरूवात झाली आहे. शहरातील सात संकलन केंद्रावर हे रद्दी संकलनाचं काम सुरू आहे.
रद्दी संकलनानंतर ती रद्दी विकली जाते. त्यातून आलेल्या पैशांतून गरीब, निराधार वंचितांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि कपडे वाटप केले जातात. शहरातील जठारपेठ भागातला गजानन महाराज मंदिर परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसरात गरिबांना फराळ आणि कपड्यांचे वितरण केले जाते. यासोबतच इतरही भागात फराळ आणि वस्त्र वितरित करून गरिबांची दिवाळी साजरी केली जाते.
रद्दी संकलनातून गरिबांची दिवाळी साजरी करण्याचा विचार अकोलेकरांतील संवेदनशीलतेची साक्ष देणारा आहे. सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम शिंदेंसारख्या समाजासाठी कायम झटणाऱ्या कार्यकर्त्याला गावानं दिलेलं पाठबळ हे एका शाश्वत आणि सकारात्मक विचारांची नांदी आहे. अकोलेकरांची ही चळवळ उत्तरोत्तर अशीच वाढत राहील यात कोणतीच शंका नाही.
पहिल्या वर्षी लोटगाड्यावर जमा केली होती रद्दी :
पहिल्या वर्षी २००५ मध्ये जेंव्हा शिंदे यांनी हा उपक्रम सुरू केला तेंव्हा सुरूवातीला ते एकटेच होते. त्यांनी तेंव्हा स्वत: चारचाकी लोटगाडी शहरभर फिरवत लोकांकडे रद्दीची अक्षरश: 'भिक' मागितली. अनेकांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांना सहकार्य केलं. तर अनेकांनी पाठही फिरवली. काही ठिकाणी त्यांना अपमानही सहन करावे लागलेत. कधीकाळी हे अनुभव घेतलेल्या पुरूषोत्तम शिंदे यांची चळवळ अकोलेकरांनी 'लोकचळवळ' बनविली आहे.
वेड्यांसाठी झटणारे 'ध्येयवेडे' पुरूषोत्तम शिंदे :
पुरूषोत्तम शिंदे यांना संपूर्ण अकोला शहर ओळखतं. ते शहरातील वेड्यांचा पालक म्हणून. अकोल्यातील वेड्यांच्या विश्वात माणसांच्या जगातलं एकच नाव ओळखीचं आहे. ते नाव म्हणजे पुरूषोत्तम शिंदे. बरेचदा अबोल असणारे किंवा स्वत:शी आभासी वायफळ बडबड करणाऱ्या या वेड्यांना पुरूषोत्तम अगदी सहज बोलतं करतात. ते अनेक वेड्यांवर उपचार, कधी कपडे, कधी चप्पल तर कधी अगदी कटींग करून देण्यापर्यंतची कामे ते कायम करीत असतात. या वेड्यांना त्यांच्या कुटूंबियांपर्यंत पोहोचविण्यासाठीही त्यांची कायम धडपड असते.
अकोल्यातील या केंद्रांवर करता येईल रद्दी जमा :
हॉटेल सेंटर प्लाझा,
केडीया प्लॉट, अकोला.
द. प्रभात बेकरी,
होलिक्रॉस शाळेजवळ, अकोला.
अॅस्पायर इन्स्टिट्यूट,
गोरक्षण रोड, अकोला.
लोकमान्य वॉच कंपनी,
टिळक रोड, अकोला.
प्रभात किड्स स्कूल,
दुध डेअरीजवळ, अकोला.
चिंतामणी मेडीकल,
डोके पेट्रोल पंपाजवळ, अकोला.
छाया मेडीकल,
डाबकी रोड, अकोला.