Govindbaug Baramati : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारांसह अजित पवार सुप्रिया सुळे उपस्थित
पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
Diwali in Govindbaug Baramati : राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला जात आहे. आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्रच आहे. दिवाळी पाडवा हा महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. बारमतीत पवार कुटुंबियांकडून (Pawar family) मोठ्या उत्साहात दरवर्षीच दिवाळीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते गोविंद बागेत (Govindbaug) येत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), आमदार रोहित पवार (Rohit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीतील गोविंद बागेत पाडव्याच्या दिवशी येत असतात. यावर्षी देखील कार्यकर्ते दाखल झाले होते. याची जय्यत तयारी गोविंद बागेत करण्यात आली होती. तबब्ल दोन वर्षानंतर गोविंद बागेत पाडवा साजरा होत आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत पवार कुटुंबियांनी प्रत्यक्ष भेटून नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
अजित पवार यांच्याकडून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
दरम्यान, यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी अजित पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वाचे आभारही मानले. पवार साहेब दरवर्षी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना भेटतात. आम्हीही सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि मी लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळं आम्हीही लोकांना भेटतो. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल अजित पवारांनी आभार मानले. फोटोला यावेळी आम्ही मर्यादा आणल्या होत्या. गर्दीमुळे फोटो काढणे शक्य झाले नाही. त्यामुळं कोणी गैरसमज करुन घेवू नये असे अजित पवार यावेळी म्हणाले.
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीपाची पिकं वाया गेली आहेत. शेतकरी परेशान झाले असल्याचे अजित पवार म्हणाले. आज सण आहे. त्यामुळं पॅालिटिकल विचार करु नका. मी दिवाळी संपल्यावर यावर बोलेन असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण : रोहित पवार
महाराष्ट्रभरातील लोक भेटण्यासाठी आले आहेत. इथे आल्यावर कळत की कस काम करावं. सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेऊन काम केलं पाहिजे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. इथे आल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मिळते. मोठ्या संख्येने साहेबांवर प्रेम करणारे नागरिक भेटण्यासाठी आले आहेत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असतो असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे. मागच्या वर्षी 110 टक्के पाऊस पडला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत होते आता तर 126 टक्के पाऊस पडला असल्याचे रोहित पवार म्हणाले. या सरकारने सर्वसामान्य लोकांना मदत झाली पाहिजे अशी भूमिका घ्यावी. अधिकारी सिलेटीव्ह पंचनामे करत आहेत. त्यांना सरसकट पंचनामे करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यामुळं लोकांना मदत होईल असे रोहित पवार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार होत असेल तर चांगली गोष्ट आहे. एका मंत्र्यांकडे जर पदभार असेल तर काम रखडली जातात. जर मंत्रीमंडळ विस्तार झाला तर लोकांची कामे मार्गी लागतील
असेही रोहित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: