मुंबई : राज्यात कोरोनाचे 22 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 203 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 10 रुग्ण मुंबईचे असून 5 रुग्ण पुण्याचे, 3 नागपूरचे, 2 अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 35 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आज राज्यात 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एका 40 वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचं आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील कोरोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता 8 झाली आहे.


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांची आकडेवारी




  • मुंबई - 85

  • पुणे (शहर व ग्रामीण भाग) - 37

  • सांगली - 25

  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - 23

  • नागपूर - 14

  • यवतमाळ - 4

  • अहमदनगर - 5

  • सातारा - 2

  • औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा - प्रत्येकी 1

  • इतर राज्य - गुजरात - 1

  • एकूण - 203


राज्यात आज एकूण 394 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 4210 जणांना भरती करण्यात आलं आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3453 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 203 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 35 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 17 हजार 151 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 960 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


संबंधित बातम्या