नवी दिल्ली : पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे. '
पंतप्रधाम मोदींनी देशातील जनतेला संबोधित करण्याआधी त्यांची माफी मागितली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'सर्वात आधी मी सर्व देशवासियांची क्षमा मागतो. मला माहित आहे, तुम्ही मला नक्कीच माफ कराल, कारण गेल्या काही दिवसांत असे निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळे तुम्हा सर्वांना अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. खासकरून मी माझ्या गरिब बांधवांना पाहतो, त्यांना वाटत असेल की, असा कसा पंतप्रधान आहे? आम्हाला कसं एवढ्या कठिण परिस्थिती आणून सोडलं आहे, पण त्यांची मी विशेषकरून माफी मागतो.'
'अनेकजण माझ्यावर नाराजही असतील की, असं कसं मी सर्वांना घरात बंद करून ठेवलं? मी तुमची समस्या समजतो, आणि तुम्हाला होणारा त्रासही जाणतो. परंतु, भारतासारखा 130 कोटींची लोकसंख्या असणाऱ्या देशाला कोरोना विरूद्धची लढाई लढण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. कोरोनाच्या विरोधातील लढाई जीवन आणि मृत्यूमधील लढाई आहे. या लाढाईत आपल्याला जिंकायचयं, त्यामुळेचे ही कठोर पावलं उचलणं गरजेचं होतं. कोणाचीच इच्छा नसते, असे निर्बंध लावण्याची, परंतु जगभरातील परिस्थिती पाहिली तर असं वाटतं की, हाच एक रस्ता आहे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी, मी पुन्हा एकदा तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल माफी मागतो.' असं मोदी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की,'आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेलच, 'एवं एवं विकारः अपी तरुन्हा साध्यते सुखं' म्हणजेच, एखादा आजार आणि त्याच्या प्रकोपापासून सुरुवातीलाच लढावं, अन्यथा परिस्थिती आपल्या हातातून निसटून जाते. सध्या प्रत्येक भारतीय हेच करत आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जग कैद केलं आहे. हा व्हायरस कोणत्याही राजकीय सिमांमध्ये बांधलेला नाही, तर कोणत्याही क्षेत्रापुरता मर्यादित नाही. हा व्हायरस माणसाला मारून त्याला संपवण्याची जिद्दच घेऊन बसला आहे. त्यामुळे याला नष्ट करण्यासाठी संपूर्ण मानवजातीला एकत्र येण्याची गरज आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लॉकडाऊन पाळणं का महत्त्वाचं आहे याबाबतही सांगितलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'काही लोकांना वाटतं की, लॉकडाऊनचं पालन करून दुसऱ्यांवर उपकार करत आहेत. पण असा गैरसमज ठेवू नका. हा लॉकडाऊन तुम्हा सर्वांच्या भल्यासाठी आहे. तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे, तुमच्या कुटुंबाला वाचवायचं आहे. आता तुम्हाला येणाऱ्या दिवसांत धैर्य दाखवायचं आहे, लक्ष्मण रेषेचं पालन करायचं आहे. मला हेदेखील माहिती आहे की, कोणलाच कायदा, नियम तोडायचे नाहीत, पण तरिही काही लोक असं करत आहेत. कारण अद्याप त्यांना स्थितीचं गांभीर्य समजलेलं नाही. अशा लोकांना हेच सांगेल, लॉकडाऊनचा नियम तोडला तर कोरोना व्हायरसशी बचाव करणं कठिण होईल. जगभरातील अनेकांचा असाच समज होता, ते सर्व पश्चाताप करत आहेत.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आपल्याकडे एक म्हण आहे, 'आर्योग्यमं परं गय्म स्वास्थ्यं सर्वार्थ साधनं' म्हणजेच, आरोग्यही सर्वात मोठं भाग्य आहे. जगभरातील सर्व सुखांचं साधन आरोग्यचं आहे. '
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमावेळी कोरोनाशी लढून त्यातून बरं झालेल्या काही लोकांशी संवाद साधला आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या लोकांचे अनुभव देखील ऐकून घेतले आहेत.
भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील 27 राज्यांमध्ये कोरोना हैदोस घालत आहे.
जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळए सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे.