ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकरांना विष्णूदास भावे पुरस्कार; आळेकर म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे रंगभूमीचा प्रसाद
नाट्य परिषदेतील वाद मिटावेत, आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे. 100 व्या नाट्य संमेलनाचं साचलेलं पाणी प्रवाही करावे, आणि लवकरात लवकर नाट्य संमेलनाच आयोजन करावे अशी मागणी आळेकर यांनी केली.
Sangli News Update: आद्य नाटककार विष्णूदास भावे यांच्यापूर्वीही नाटके होत होती. परंतु या नाटकाचा व्यवसाय होऊ शकतो, हे विष्णुदास भावे यांनी दाखवून दिले, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. 5 नोव्हेंबर या रंगभूमी दिनी आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानीत करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याहस्ते आळेकर यांना गौरव पदक प्रदान करण्यात आले. सांगलीतील भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, नाट्य परिषदेतील वाद मिटावेत आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे. 100 व्या नाट्य संमेलनाचं साचलेलं पाणी प्रवाही करावे, आणि लवकरात लवकर नाट्य संमेलनाच आयोजन करावे अशी मागणी आळेकर यांनी जब्बार पटेल यांच्याकडे केली.
आळेकर म्हणाले, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, भावे गौरव पदक हा पुरस्कार अत्यंत जवळचा वाटतो. हा पुरस्कार म्हणजे रंगभूमीचा प्रसादच आहे. नाटक ही प्रवाही गोष्ट आहे. नाटकातून कोणत्याही प्रकारचा प्रचार दिसला की प्रेक्षक दुरावतो. माझ्या नाटकाचे कमी प्रयोग झाले, तरीही प्रेक्षकांना ती बघावीशी वाटली. त्यांनी माझी नाटके समजून घेतली. माझ्या नाटकांची त्यांनी कधी टिंगल, चेष्टा केली नाही. कोणत्याही नाटकाची चेष्टा करुन परंपरा कायम राहत नाही. त्यामुळे एकाच नाटकाचे प्रयोग त्याच ताकदीने होतील असे नाही. त्यामध्ये सतत मोडतोड, पुनर्जुळणी सुरु असते, असं आळेकर म्हणाले.
नाट्य परिषदेतील वाद मिटावेत आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे
त्यांनी पुढं म्हटलं की, नाटकांची साधने आदरपूर्वक वापरावी लागतात. त्यासाठी नाटकांची परंपरा समजून घ्यावी लागतात, असेही शेवटी आळेकर यांनी स्पष्ट केले. नाट्य परिषदेतील वाद मिटावेत, आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे. 100 व्या नाट्य संमेलनाचं साचलेलं पाणी प्रवाही करावे, आणि लवकरात लवकर नाट्य संमेलनाच आयोजन करावे अशी मागणी आळेकर यांनी जब्बार पटेल यांच्याकडे केली.
विष्णूदास भावे यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराचा आनंद अद्वितीय- जब्बार पटेल
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, मला माझ्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले, पण विष्णूदास भावे यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराचा आनंद अद्वितीय होता. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यानंतर यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना माझ्याहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी आळेकर यांची निवड योग्य आहे. ते म्हणाले, नाट्यसंगीतात वेगळे प्रकार झाले नाहीत, मात्र आळेकर यांच्या नाटकात असे वेगळे प्रकार झाले. वेगळेपण असलेली नाटके फार कमी आहेत, त्यामध्ये सतीश आळेकर यांची नाटके आहेत, असं जब्बार पटेल म्हणाले.
जब्बार पटेल म्हणाले की, आळेकर यांच्या नाटकातून आज अनेक नट तयार झाले असून ते विविध ठिकाणी कार्यरत आहेत. प्रारंभी नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले. प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अविनाश सप्रे यांनी परिचय करुन दिला. यावेळी स्थानिक रंगकर्मी चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन, अविनाश सप्रे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्र मासाठी विनायक केळकर, मेधाताई केळकर, लोकसाहित्याच्या अभ्यासिका प्रा. तारा भवाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.