(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंदूंचा अवमान करणाऱ्या शार्जीलवर तात्काळ कठोर कारवाई करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं होतं. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.
पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी यानं केलं होतं. शार्जिल उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे. शार्जीलच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली.
'आजचा हिंदू समाज सडलेला!', एल्गार परिषदेत शार्जील उस्मानीच्या वक्तव्यानं वादंग
देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलयं?
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दि. 30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत.
या भाषणातील शब्दश: वाक्ये अशी आहेत...
‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है...’
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल. खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे, किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय्. या प्रकरणात कठोरातील कठोर आणि तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केली आहे.
दरम्यान याआधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील शार्जील उस्मानीच्या या वक्तव्यावर टीका केली होती. दरेकर म्हणाले की, शार्जील उस्मानी यांनी केलेलं हे वक्तव्य हे विकृत मानसिकतेतून आलं आहे. त्यांचाच मेंदू सडला आहे, असं दिसतंय. आता या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे हिंदू समाजावर टीका करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे दाखवून द्यावं ही अपेक्षा आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकर म्हणाले की, मुस्लिम समाजावर एखादं वक्तव्य झाल्यावर तात्काळ कारवाई केली जाते किंवा भूमिका घेतली जाते, आता हे वक्तव्य आल्यावर या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
कोण आहे शार्जील?
उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठात सिटीजन अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. शार्जील उस्मानी हा विद्यार्थी म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. हा मोर्चा सुरू असतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मोठा हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचाराला जबाबदार धरत विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शार्जील उस्मानीचा समावेश होता. जुलै महिन्यात न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केलं होतं. शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेसाठी वक्ता म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं.