(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झाडीपट्टी कलाकारांची दिवाळी अंधारात, शासनाने कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी
दिवाळी काही दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. तरीही भंडारा गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकारांनी कार्यक्रमाची एकही सुपारी फोडली नाही.
गोंदिया : यंदा कोरोनाचा सावट असल्याने याचा परिणाम अनेक उद्योगांना झाला असून यात पूर्व विदर्भातील झाडीपट्टी कलाकारांवर सुद्धा कोरोनाचा परिणाम झाला आहे. दिवाळी तोंडावर आली असली तरी कलाकारांनी कार्यक्रमाची सुपारीही फोडली नसल्याने यंदाची दिवाळी अंधारातच राहणार आहे.
दरवर्षी गणपती उत्सव सुरु झाले की ग्रामीण भागात यात्रा, उत्सव, सुरु होत असतात. याच यात्रेत येणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी तमाशा, दंडार, नाटके, गोंधळ यांचे आयोजन केले जाते. या आयोजनाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील झाडीपट्टी कलाकारांना दोन पैसे मिळतात. त्यातून त्यांच्या आयुष्याचा गाडा चालत असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पाहायला मिळाले आहे. शासनाने लॉकडाऊन लावले होते. मात्र आता काही प्रमाणात शिथिलता दिली असून दारू दुकाने, बाजारपेठ, रेल्वे,एसटी, सेवा सुरु झाली आहेत. मात्र झाडीपट्टी कलाकारांना आपली कला सादर करता येत नाही.
दिवाळी काही दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. तरीही भंडारा गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकारांनी कार्यक्रमाची एकही सुपारी फोडली नाही. त्यामुळे शासनाने झाडीपट्टी कलाकार यांचे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी द्यावी जेणे करून हे कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करून आपल्या कुटुंबियांची पालन पोषण करू शकतील. नाही तर या कलाकारांची दिवाळी अंधारात होणार असल्याची खंत कलाकारांनी व्यक्त केली आहे.
मायबाप सरकारने राज्यात शिथिलता दिली असली तरी दिवाळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला अजूनही परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो कलाकारांची परिस्थिती बिकट झाली आहे. आता सरकारने कार्यक्रमांची परवानगी द्यावी जेणेकरुन हे कलाकार आपला उदरनिर्वाह भागवू शकतील हीच विनंती हे कलाकार बांधव करीत आहेत.