बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार : सुनील केदार
खिल्लार जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढवण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं सुनील केंदार यांनी म्हटलं.
मुंबई : राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडा मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार म्हणाले की, संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडा शर्यत सुरु आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.
राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढवण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडा स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, शेतकरी आणि बैलगाडा मालक आणि विविध संघटनांचा शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.