कोरोनानं राज्यात तीन ज्येष्ठ पत्रकारांचा मृत्यू, सोपान बोंगाणे, अशोक तुपे, मोतीचंद बेदमुथा यांचं निधन
राज्यातील तीन ज्येष्ठ पत्रकारांचे कोरोनामुळं निधन झालं. उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनामुळं येथे निधन झाले.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाहीय. आज राज्यातील तीन ज्येष्ठ पत्रकारांचे कोरोनामुळं निधन झालं. उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झाले. तर लोकसत्ताचे श्रीरामपूर येथील पत्रकार अशोक तुपे यांचंही आज निधन झाले. त्यांना आधी कोरोना झाला होता, त्यातून ते बरे झाले होते. मात्र आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तर ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही आज कोरोनानं निधन झालं.
मोतीचंद बेदमुथा यांचे हैदराबादमध्ये निधन
उस्मानाबाद येथील जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचे वयाच्या 69 व्या वर्षी हैदराबाद येथे एका खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान निधन झालं.त्यांनी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॕण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष तसेच मराठवाडा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे उपाध्यक्ष, सचिव , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं तसेच उस्मानाबाद येथील दैनिक समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते.
अशोक तुपे यांचंही आज निधन
अहमदनगरचे लोकसत्ता प्रतिनिधी अशोक तुपे यांचंही आज निधन झालं. सहकार, शेती, ग्रामीण विकास, राजकारण अशा विषयांमध्ये त्यांचा हातखंडा होता. तसेच मानववंशशास्त्रापासून ते इतिहासापर्यंत सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास होता. ग्रामीण भागात राहून त्यांनी बातमीदारीची एक नवी व्याख्या तयार केली होती.
ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचे पुण्यात निधन
ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन झाले. नागरी प्रश्नांचे अभ्यासक असलेल्या बोंगाणे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या एस एम देशमुख यांनी दिली आहे. राज्यात एकाच दिवशी तीन ज्येष्ठ पत्रकारांच्या मृत्यूने त्यांच्या परिजनांसह पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.