रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात काहींनी आपलं उखळ पांढरं करून घेतल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील संममेश्वर येथे समोर आला आहे. संगमेश्वर बाजारपेठेला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर अवैधरित्या उत्खनन केले. त्यानंतर यातील शेकडो ट्रक माती ही जवळच्या नदीपात्रात देखील टाकण्यात आली. परिणामी आता संगमेश्वर बाजारपेठेला आता पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सारे व्यवहार, कामे बंद होती. अशावेळी देखील राजरोसपणे अशा प्रकारचे उत्खनन सुरु कसे होते? यावर देखील शंका उपस्थित केली जात आहे.
दिवसाढवळ्या सुरु असलेल्या कामाकडे महसुल प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाचे लक्ष का गेले नाही का? यामध्ये देखील अनेकांचे हात असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले? असा सवाल देखील केला जात आहे. स्थानिकांनी या साऱ्या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर तहसिलदार सुहास थोरात यांनी संबंधिताला सहा कोटींचा दंड ठोठावला. यातील धक्कादायक बाब म्हणजे या उत्खननाकरता कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. शिवाय, रॉयल्टी देखील भरलेली नव्हती. त्यामुळे तहसिलदार घेत असलेल्या भूमिकेबद्दल देखील आता शंका उपस्थित केली जात आहे. उत्खननापासून काही अंतरावर दोन नद्यांचा संगम असल्यानं नदी पात्रात माती टाकल्यानं नदी काठी असलेल्या संगमेश्वर शहराला पुराचा धोका हा अनेक पटींनी वाढत आहे.


पाहा व्हिडीओ : सिंधुदुर्गात पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीबाबत प्रशिक्षण | माझं गाव माझा जिल्हा



'तहसिलदार म्हणतात दंड कुणाला ठोठावला आठवत नाही'


घटनास्थळी जात 'एबीपी माझा'नं साऱ्या परिस्थितीची पाहणी केली. शिवाय, तहसिलदारांची बाजू जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी तहसिलदार सुहास थोरात यांना संपर्क केला असता, मी सध्या कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आल्यानं कामात व्यस्त आहे. याविषयावर मी आता काहीही बोलू शकत नाही. शिवाय, कारवाई सुरु असून संबंधिताला सहा कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमाप्रमाणे यावर कारवाई केली जाईल असं उत्तर त्यांनी दिले. त्याचवेळी तुम्ही सहा कोटींचा दंड कुणाला केलात? उत्खनन करणाऱ्या व्यक्तिचं नाव सांगा अशी विचारणा देखील करण्यात आली. पण, मला त्याचं नाव आठवत नाही. तुम्ही ऑफिसशी बोला असं उत्तर तहसिलदार सुहास थोरात यांनी दिली. दरम्यान, ऑफिसशी संपर्क साधला असता त्या ठिकाणीहून देखील कोणताही प्रतिसाद किंवा उत्तर मिळालेले नाही. यानंतर देखील तहसिलदारांना तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या. जेणेकरून कामाच्या व्यापात तुमचा वेळ देखील वाचेल असा पर्याय देखील देण्यात आला. पण. त्यानंतर देखील त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. परिणामी आता तहसिलदार बोटचेपी भूमिका का घेत आहेत? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

भीतीनं कुणीही बोलत नाही


हे प्रकरण सध्या संगमेश्वरमध्ये चांगलंच चर्चिले जात आहे. या प्रकरणात कॅमेरासमोर बोलायला कुणीही तयार नाही. आमच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच काहींनी तर आमच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारची उत्तरं दिली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढते. या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. अल्पावधितच आपल्या कामानं लोकप्रिय झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी साऱ्या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी आता केली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


मुंबई - गोवा हायवेचं काम पूर्ण होण्याकरता आणखी दीड वर्षाचा कालावधी; 'एमईपी कंपनीवर मेहेरनजर का?


खवळलेल्या समुद्रातून वीजेचे खांब सिंधुदुर्ग किल्ल्यावर, मच्छिमारांचे महावितरणला सहकार्य


ऑक्सफोर्डसह अन्य विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना याविषयी अधिक ज्ञान असेल; शरद पवारांचा टोला