रत्नागिरी : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षांसंदर्भातील अंतिम निर्णय कायद्यानुसार होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार यांना विचारले असता राज्यपालांचे याविषयीचे ज्ञान अधिक असल्याचा टोला शरद पवार यांनी दिला.
पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे असं होत नाही. याबातीत राज्यपालांचे ज्ञान जास्त असेल असे मला वाटते,” असा टोला शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 'निसर्ग' चक्रीवादळाने हानी पोचलेल्या कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले दोन दिवस आहे. मंगळवारी रायगड जिल्हयातील नुकसानीची पाहणी करुन आज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली या तालुक्यातील गावातील नुकसानीची पाहणी केली.
शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत तात्काळ उद्याच बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. गरज भासल्यास आम्ही केंद्राकडे मदतीची मागणी करू. मुख्यमंत्र्याच्या पुढाकाराने हे करण्यात येईल.
"कोकणातील शेतकरी हा कोणत्याही सुलतानी व अस्मानी संकटाना घाबरणारा नाही अनेक संकटे पचवून तो वेळोवेळी ठामपणे ताठ कण्याने उभा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त कोकणी माणसाला सरकार मदत करेल' असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी नुकसानीबाबत प्रत्यक्ष नागरीकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
स्थानिक नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधताना व चर्चा करताना खासदार शरद पवार हेसुध्दा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही परिस्थितीत कोकणातील कोणताही नुकसानग्रस्त माणूस अथवा कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त नागरीकांना धीर देण्याचा शरद पवार यांनी यावेळी प्रयत्न केला.