मुंबई : गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणार आणि त्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुसाट होणार असल्याचं सांगितले जात होते. पण, प्रत्यक्षात मात्र आता मुंबई - गोवा हायवेचे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 'मिन्स्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवे'च्या 5 मे 2020 रोजीच्या पत्रावरुन ही बाब आता स्पष्ट झाली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड हे 90 किमी अंतराचे काम एमईपी कंपनीकडे आहे. पण, अद्याप देखील हे काम अपूर्ण आहे. 2017 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 हे वर्ष आता अर्धे सरले तरी अद्याप देखील हे काम पूर्ण झालेले नाही. कंपनीने आतापर्यंत केवळ 10 टक्केच काम केले आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्याने या कंपनीला काम रद्द करण्याबाबत देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत तीन वेळा काम पूर्ण होण्याकरता अधिकचा काळ अर्थात ईओटी देण्यात आले आहे. पण, त्यामध्ये कोणताही सुधारणा नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानं एमईपी कंपनीवर मेहेरबानी का? असा सवाल आता विचारला जात आहे. शिवाय कंपनीने मागील काही दिवसांमध्ये केलेले काम पाहता पुढील दीड वर्षात हे काम कसे पूर्ण होणार? असा सवाल देखील केला जात आहे. एमईपी कंपनीला दिलेल्या वाढीव कालावधीपैकी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी हा लोटला असल्याचे देखील या पत्रावरुन स्पष्ट होत आहे.


नितीन गडकरींनी भूमीपूजन केलेल्या पुलाची अवस्था


2014 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सप्तलिंगी या पुलाचे भूमिपुजन करत कामाचा शुभारंभ केला. पण, प्रत्यक्षात मात्र या पुलाचे केवळ 2 पोलच बांधून पूर्ण झालेले आहेत. शिवाय, काही ठिकाणी खोदकाम देखील करून ठेवलेले असल्याचे दिसून येते. पुलांच्या बांधकामाचं कंत्राट हे दुसऱ्या एका कंपनीकडे होते. पण, हे काम पूर्ण करण्यास देखील संबंधित कंपनीला यश आलेले नाही. परिणामी नव्याने निविदा काढण्यात आली असून पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होईल असा विश्वास अधिकारी व्यक्त करतात.


आणखी किमान 3 वर्षाचा कालावधी


एमईपी कंपनीला आरवली ते वाकेड हे 90 किमीचे काम पूर्ण करण्यासाठी वाढीव दीड वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असला तरी किमान तीन वर्षे किंवा त्यापेक्षा देखील जास्त कालावधी लागू शकतो असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. या गोष्टीला एनएचएआयचे अधिकारी देखील दुजोरा देतात.


Nisarga Cyclone Effect | रत्नागिरीला 'निसर्ग'चा तडाखा, अनेकांचा संसार उघड्यावर