सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजेच्या तारा तुटून याठिकाणचे वीज खांब कोसळले. यामुळं गेले आठ दिवस खंडित झालेला वीज पुरवठा वीज वितरणने सुरळीत केला आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना देखील वीज खांब होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर आणताना मच्छिमारांनी मोठी मदत वीज वितरणला केली.


निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग किल्लावरील माडाचे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळले. यात वीज तारा व वीज खांब तुटून नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला. मात्र खराब समुद्री हवामान व पावसामुळे तात्काळ दुरुस्ती काम करण शक्य नव्हते. गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने वीज वितरणने दुरुस्ती काम हाती घेतली.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर नेणे काहीसे जोखमीचे होते. मच्छिमार बांधव, किल्ले रहिवाशी यांच्या सहकार्यातून तीन वीज खांब व साहित्य होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर पोहोचवण्यात आले. वीज वितरण महिला अधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी यांनी जोडणी पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला.

तळकोकणात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या मोती तलावात आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पोलीस विभागाच्या सागरी सुरक्षा रक्षक विभागाच्यावतीने हे प्रात्यक्षिकाद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जे. बी. साळुंखे आदी उपस्थित होते.